भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनकडून आयोजन
marathinews24.com
पुणे – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लक्ष्य’ हा शास्त्रीय नृत्यप्रकारांवरील विशेष कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक प्रसार उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्था(पुणे) यांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे.हा कार्यक्रम रविवार २६ ऑक्टोबरला सायं. ५.३० वाजता भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (शिवाजीनगर) पुणे येथे होणार आहे.
बंगाली बांधवांचा काली माता पूजा उत्सव सुरू – सविस्तर बातमी
‘लक्ष्य’ या कार्यक्रमात तीन शास्त्रीय नृत्यशैलींची वैयक्तिक सादरीकरणे होणार असून प्रेक्षकांना भारतीय नृत्यपरंपरेचा अप्रतिम अनुभव घेता येणार आहे. या कार्यक्रमात स्वराली भोपे (कुचिपुडी), स्वरदा भावे (भरतनाट्यम) आणि नृत्यगुरू उमा डोगरा (कथक) या तीन कलाकारांच्या एकल नृत्यसादरीकरणांचा समावेश आहे. तीन भिन्न शैलींतील नृत्य, भावाभिव्यक्ती आणि ताल यांचा संगम या सायंकाळी अनुभवता येणार आहे.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम उपक्रमांतर्गत होणारा हा २६० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.





















