लोणावळ्यातील 81 महिलांचा स्पोकन इंग्लिश कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद, १८ वर्षांच्या तरुणींपासून ६२ वर्षांच्या जेष्ठ महिलांचा सहभाग
marathinews24.com
लोणावळा – महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे ध्येय समोर ठेऊन लोणावळा विमेन्स फाउंडेशन (LWF) च्या वतीने लोणावळा परिसरातील महिलांसाठी स्पोकन इंग्लिश स्किल डेव्हलपमेंट कोर्सचा शुभारंभ करण्यात आला. या कोर्सच्या शुभारंभाच्या दिवशी एकूण 81 महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विशेष म्हणजे या कोर्ससाठी 18 वर्षांच्या तरुणींपासून 62 वर्षांच्या जेष्ठ महिलांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे भाषा शिकण्याला वयाचे बंधन नसते हे अधोरेखित झाले. क्वेसीतम अकॅडमीचे स्पोकन इंग्लिश प्रशिक्षक श्री. मयूर कनगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन महिन्यांचा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे. महिलांची इंग्रजी बोलण्याची क्षमता वाढविणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
एकविरा माता देवी मंदिराच्या सोयसुविधेचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी
या कोर्समध्ये इंग्रजी भाषेतील व्यावहारिक शब्दसंग्रह, संवादातील प्रवाहीपणा आणि कार्यक्षेत्रातील संवाद कौशल्य यावर आधारित इंटरॲक्टिव्ह सत्रांचा समावेश असेल. या कोर्सच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात लोणावळा विमेन्स फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. ब्रिन्दा अनीश गणात्रा यांनी सांगितले की, “भाषा हे सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन आहे. हा कोर्स महिलांना नोकरी संदर्भात मुलाखतींमध्ये, कार्यक्षेत्रात तसेच दैनंदिन जीवनात स्वतःला स्पष्ट व आत्मविश्वासाने व्यक्त होण्यास सक्षम बनवेल. आम्हाला विश्वास आहे की श्री. मयूर कनगुटकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे कोर्समध्ये सहभागी महिला इंग्रजी संभाषणात निपुण होतील आणि त्यांच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होतील.”
हे प्रशिक्षण लोणावळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करण्यात आले असून सर्व निवडलेल्या सहभागींसाठी सोयीचे ठरेल. या उपक्रमाद्वारे लोणावळा विभागातील महिलांना स्वावलंबी व कौशल्यसंपन्न बनविण्याच्या LWF च्या ध्येयात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.



















