खिशातून पैसे हिसकावले; तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – तरुणाच्या डोक्यात लोखंडी पट्टीने मारहाण करुन खिशातील जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या तिघा जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत संदीप हिरालाल राहिदास (२६, रा. प्रायव्हेट रोड) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वसीम शेख (२५, रा. प्रायव्हेट रोड) आणि श्याम काळे (२५, रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली आहे. तर, त्यांचा साथीदार शाम किशोर काळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता घडला.
मैत्रिणीनेच कॉफीतून दिले कुंगीचे औषध – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा चहाच्या टपरीवर काम करतो. तो रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ताडीवाला रोडवरील रुमवर गेली. त्यानंतर रूमच्या पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी त्याच्या ओळखीचे वसीम शेख व श्याम काळे हे दोघे जण बसल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना संदीप याने ‘आप यहा क्यु बैैठे हो’, असे विचारले असता त्यांनी ‘हमे पुछनेवाला तु कौन,’ असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर संदीप याच्या पॅन्टचे खिसे तपासून पैशाची मागणी केली. तेव्हा संदीप पळत रूमच्या बाहेर आला. दोघेही त्याच्या मागे पळत आले. वसीम शेख याने त्याच्याजवळील लोखंडी पट्टीने संदीप याच्या डोक्यात वार केला. त्याच्या डोक्यात जखम होऊन रक्त येऊ लागले. त्यावेळी आजूबाजूला थांबलेल्या लोकांकडे पाहून ‘अगर कोई बीच मे आया तो याद रखो, यही पर काट डालुंगा,’ असे म्हटले. त्यामुळे लोक त्यांच्या दहशतीला घाबरून पळून गेले. त्या दोघांनी खिशामध्ये ठेवलेले ६ हजार २०० रुपये काढून घेऊन पुन्हा संदीपला मारहाण करुन पळ काढला. संदीपचे शेठ शाहिद अनवर शेख यांनी त्याला ससून रुग्णालयात घेऊन जात उपचार केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते करत आहेत.