भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा विश्वास
marathinews24.com
पुणे – देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होणार असून युपीएच्या ठिकऱ्या उडणार आहेत. युपीएतील खासदारसुद्धा आता राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाला कंटाळले असून क्रॉस व्होटिंगचा युपीएला धोका आहे. सर्वाधिक सावध रहाण्याची गरज युपीए आणि राहुल गांधी यांना आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना सावधगीरीचा सल्ला द्यावा अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी ( दि.८) केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी भाजपाला शहाणपण शिकवू नये, असेही बन यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा – सविस्तर बातमी
भारतीय जनता पार्टीने यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतल्यामुळे भाजपा हा सेक्युलर झाला या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी राऊत यांना लक्ष्य केले. भाजपासाठी ३६५ दिवस पवित्र असल्याने आम्हाला निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागत नाही. पितृपक्ष असल्याने निवडणूक घेऊ नये, हा राऊत यांचा केवळ बहाणा आहे. खरं म्हणजे ते घाबरले असून निवडणुकीपासून पळ काढत आहेत अशी टीका . बन यांनी केली.मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचा नव्हे तर महायुतीचा महापौर होणार आहे. राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं थांबवावे. आज खरी शिवसेना भाजपासोबत आहे. आगामी महापालिका निवडणुकाही आम्ही मराठी माणसाच्या आणि सर्व सामान्यांच्या ताकदीवर जिंकणार आहोत असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
आमदार रोहित पवार यांची पळताभुई थोडी
आमदार रोहित पवारांवर निशाणा साधत बन म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे रोहित यांची पळताभुई थोडी झाली असून त्यामुळे आलेल्या हताशेतून रोहित पवार रोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. शरद पवार रोहित यांना कधीच प्रदेशाध्यक्ष करणार नाहीत, याची जाणीवही त्यांनी रोहितला करून दिली. मराठा बांधव आजही फडणवीस यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत हे सत्य रोहित यांनी स्विकारावे असाही सल्ला बन यांनी दिला.




















