त्र्यंबकेश्वर घटनेवर पुण्यात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
marathinews24.com
पुणे – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, पुणे तर्फे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देताना अड. अमोल पाटील (राज्य संघटक), महेश टेळेपाटील (अध्यक्ष – पुणे शहर), विजय रणदिवे (कार्याध्यक्ष), दिनेश वढणे (सरचिटणीस), रोहित दळवी (सचिव), शिवाजी हुलावळे (संघटक), मनिष कांबळे (विश्वस्त), कैलास गायकवाड (विश्वस्त) पत्रकार बांधव राजू शिंगाडे, मुकेश वाडकर, अमित मुंडिक, विनोद आवाड, अजय सूर्यवंशी, लहू पारवे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामावरुन काढल्याने ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण – सविस्तर बातमी
२० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिन्ही पत्रकार नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
संघटनेने या घटनेला लोकशाहीवर थेट प्रहार ठरवित कठोर शब्दांत निषेध नोंदवला. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो. अशा पत्रकारांवर होणारे हल्ले केवळ व्यक्तींवर नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर आहेत. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याचा प्रभावी अंमल अद्याप होत नाही, त्यामुळे हल्लेखोरांना भीती राहिलेली नाही,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.
पत्रकार संघटनेच्या मागण्या
– घटनेतील सर्व आरोपींवर तत्काळ व कठोर कारवाई व्हावी
– जखमी पत्रकारांना संपूर्ण व मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी
– पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस व प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात
– आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी
– घटनास्थळी असलेले CCTV व अन्य पुरावे तातडीने जप्त करून प्रामाणिक तपास सुनिश्चित करावा
संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पत्रकार संघटना शून्य सहनशीलतेचा अवलंब करून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडली जाईल.



















