२० जणांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आमदारmबापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकार्यांसह २० जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धक्काबुक्कीची घटना शनिवारी (दि. ४ ) रात्री सव्वानउच्या सुमारास लोहगावधमील संत नगरातील गाथा लॉन्समध्ये घडली होती. दरम्यान, आमदार पठारेंच्या वाहन चालकालाही बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील चैन आणि खिशातील रोकड चोरून नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
कुख्यात नीलेश घायवळच्या घरातून काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
बंडू शहाजी खांदवे (राष्ट्रवादी अजित पवार गट) शेखर मोझे, विलास खांदवे, कालीदास खांदवे, गणेश खांदवे, रामेश्वर पोळ, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, सागर करजे, ओमकार खांदवे उर्फ ओम्या, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे यांच्यासह इतर ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या वाहनाचे चालक शकील अजमोद्दीन शेख (रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार बापूसाहेब पठारे हे ४ ऑक्टोबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास लोहगावमधील संतनगरात असलेल्या गाथा लॉन्समध्ये कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी बंडू खांदवे याच्यासह इतर २० जण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी आरोपी बंडू खांदवे याने आमदार पठारे यांना धक्काबुक्की केली.
त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी आणि पठारे यांच्या वाहनाचा चालक असलेल्या शकील शेख यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रूपयांची सोन्याची चैन, एक हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.



















