वाहतूक पोलिसांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – दिवाळीत रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहन चालकांना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे. दिवाळीत परगावाहून वास्तव्यास आलेले अनेकजण मूळगावी परतात. तसेच काहीजण पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. अनेकजण मूळगावी रवाना झाल्याने शहरातील गजबलेल्या रस्त्यांवरील वाहतूक दोन दिवसांपासून कमी झाली आहे.
पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली – सविस्तर बातमी
शहरातील गर्दीच्या रस्त्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्ते मोकळे झाल्याने वाहन चालक भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले आहे. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना सूचना दिल्या आहेत.
भरधाव वेगामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे. मोकळे रस्ते म्हणजे सुरक्षित रस्ते, असा समज करून वाहन चालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत. वाहन चालकांनी सिग्नल मोडू नये. वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करू नये. मोटार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे. मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांच्या सूचना
– वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे
– कोणीही सिग्नल तोडू नये
– मोटार चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा
– दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे
– मद्यप्राशन करू वाहन चालवू नये
मोकळ्या रस्त्यांवर वाहन चालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवून नये. दिवाळी सुरक्षितपणे साजरी करावी. वेगात नव्हे, तर सुरक्षिततेत आनंद आहे.
– हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे



















