Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

पुण्याच्या ‘उमेद’ रणरागिणी : जिद्दी,कष्टातून उभा राहिलेला स्वावलंबनाचा नवा आदर्श

पुण्याच्या ‘उमेद’ रणरागिणी : जिद्दी,कष्टातून उभा राहिलेला स्वावलंबनाचा नवा आदर्श

उमेद रणरागिणींची प्रेरणादायी यशकथा; जिद्द, कौशल्य आणि मार्गदर्शनातून पुण्यातील महिलांचे स्वावलंबन

marathinews24.com

पुणे – ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर केवळ योजना पुरेशा नसतात; त्यासाठी लागते जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संधीचा योग्य उपयोग करण्याची तयारी. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चार महिलांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचला असून, त्यांच्या यशोगाथा ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबाराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन – सविस्तर बातमी 

ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) करत आहे. स्वयं-साहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना बचत, कर्जसुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. या सर्व घटकांचा योग्य संगम साधला गेला, की महिलांच्या आयुष्यात केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडते…याचे जिवंत उदाहरण म्हणजे या ‘उमेद रणरागिणी’.

आशा विश्वास गायकवाड यांची कहाणी ही परंपरेला आधुनिकतेची जोड देणारी आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याची जाणीव त्यांना झाली. मात्र, त्यांनी परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्यातून मार्ग शोधला. PMFME योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा उपयोग करून त्यांनी डिहायड्रेशन प्रकल्प उभारला. सुरुवातीला तांत्रिक ज्ञानाचा अभाव, बाजारपेठेची अनिश्चितता आणि आर्थिक जोखीम यांसारखी आव्हाने होती; पण ‘उमेद’च्या प्रशिक्षणामुळे त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. शेवगा, बीटरूट, केळी यांसारख्या पिकांपासून नैसर्गिक पावडर तयार करून त्यांनी ‘रसायनमुक्त उत्पादन’ ही ओळख निर्माण केली. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत मागणी असून, त्यांनी इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे ‘शेतीपूरक उद्योग’ ही संकल्पना गावपातळीवर रुजत आहे.

पूजा नितीन मारगडे यांची यशोगाथा ही संकटातून संधी निर्माण करण्याची प्रेरणा देते. कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात रोजगाराचे सर्व मार्ग बंद झाले असताना त्यांनी हार मानली नाही. ‘उमेद’कडून मिळालेल्या ४० हजार रुपयांच्या बीजभांडवलातून त्यांनी घरातूनच केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहक मिळवणे, उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठेत टिकून राहणे ही मोठी आव्हाने होती. मात्र, त्यांच्या चिकाटीमुळे आणि सातत्यामुळे व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली ४४ महिला बचत गट कार्यरत असून, चकली, मसाले, बेकरी उत्पादने अशा विविध गृहउद्योगांच्या माध्यमातून महिलांना नियमित उत्पन्न मिळत आहे. पूजाताईंच्या कार्यामुळे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

श्रीमती मनीषा राजाराम कुंजीर यांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून सामाजिक नेतृत्वाचे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. अनेक वेळा शासकीय योजना उपलब्ध असतात, परंतु त्याची माहिती किंवा प्रक्रिया यामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्याचे काम मनीषाताईंनी केले. महसूल विभागाच्या सहकार्याने त्यांनी विविध शिबिरे आयोजित करून महिलांना उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे त्वरित मिळवून दिली. त्यांच्या पुढाकारामुळे दिव्यांग, अल्पभूधारक शेतकरी आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचे कवच मिळाले. त्यांनी गावपातळीवर ‘प्रशासन तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, ज्यामुळे महिलांचा शासन व्यवस्थेवर विश्वास अधिक दृढ झाला.
ज्योती साहेबराव आरगडे यांनी बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा दिली. ग्रामीण भागात खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडतात. ही समस्या ओळखून त्यांनी महिलांना संघटित केले आणि ‘उमेद’च्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांनी महिलांना बचतीची सवय लावली, तसेच पशुपालन, शिवणकाम, लघुउद्योग यांसारख्या उपजीविकेच्या पर्यायांकडे वळवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांनी कर्जमुक्तीचा मार्ग स्वीकारत स्वावलंबन प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत महिलांच्या निर्णयक्षमतेत आणि सामाजिक स्थानातही लक्षणीय वाढ झाली आहे.

या महिलांच्या यशामागे एक समान धागा आहे—‘उमेद’ अभियानाचे सक्षम मार्गदर्शन आणि जिल्हा प्रशासनाचे सातत्यपूर्ण सहकार्य. वित्तीय समावेशन, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री, बाजारपेठेची उपलब्धता आणि सततचे मार्गदर्शन या सर्व घटकांचा परिणाम म्हणून महिलांनी ‘गृहिणी’पासून ‘उद्योजिका’ होण्याचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

आज या महिलांच्या उत्पन्नामुळे त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत, आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि भविष्याबाबतची असुरक्षितता कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे, ज्यामुळे गावपातळीवर सामूहिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

“उमेदने आम्हाला केवळ आर्थिक बळ दिले नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवले. आज आम्ही स्वतः उभ्या राहिलो आहोत आणि इतर महिलांनाही उभे करत आहोत,” अशी भावना व्यक्त करत या ‘उमेद रणरागिणी’ ग्रामीण परिवर्तनाचे सशक्त प्रतीक बनल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील या यशोगाथा केवळ चार महिलांच्या संघर्षाची कथा नसून, त्या ग्रामीण भारतातील बदलत्या वास्तवाचे द्योतक आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, याचा ठोस पुरावा या ‘उमेद’ रणरागिणी देत आहेत.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×