पुणे विमानतळावरील घटना, गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आल्याची घटना १९ सप्टेंबरला घडली. त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचा परवाना असून, बागल हे पुणे ते वाराणसी असा प्रवास करणार होते. मात्र, त्यांनी परराज्यात पिस्तूल नेण्याची परवानगी स्थानिक पोलिसांकडून न घेतल्यामुळे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विमानतळावरील सुरक्षा चौकशीत पिस्तूल आढळून आले.
दरोड्यापुर्वीच पुणे पोलिसांनी तीन टोळ्यांचा डाव उधळला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बागल (वय ६३, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) हे शुक्रवारी (दि. १९) रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर गेले होते. चेक-इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचार्यांनी स्कॅनरमधून केली. त्यावेळी बॅगेत रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे असल्याचे दिसून आले. दरम्यान, बागल यांच्याकडे शस्त्र परवाना असून, तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे ते हे शस्त्र घेऊन विमानातून दुसर्या राज्यात प्रवास करू शकत नसल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर बागल यांना नोटीस बजावून सोडण्यात आले.





















