मित्रावर खासगी क्लासमध्येच गळा, पाठीवर केले वार
marathinews24.com
पुणे – भांडणाच्या रागातून मित्रानेच खासगी कोचिंग क्लासमध्ये शिरून शालेय विद्यार्थ्यांवर चाकूने गळा चिरून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १५) राजगुरूनगमध्ये घडली आहे. ऐन शिकणूकीच्या क्लासमध्येच रक्तरंजित थरार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक शिकवत असताना हल्लेखोराने विद्यार्थ्याने चाकूने मित्राचा गळा चिरला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १६) असे हत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी हल्लेखोर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बोपदेव घाटातील लॉजवर छापा; बांगलादेशी तरुणी ताब्यात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगरमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला पुष्कर शिंगाडे आणि त्याचा मित्रामध्ये तीन महिन्यांपुर्वी किरकोळ कारणावरून वादविवाद झाले होते. त्याच रागातून आरोपीच्या मनात सुडाची भावना होती. दोघेही एकाच खासगी क्लासमध्ये होते. सोमवारी सकाळच्या सुमारास पुष्करसह आरोपी वर्गात बसले होते. त्यावेळी शिक्षक शिकवत असताना आरोपीने त्याच्या बॅगेतून चाकू काढला. थेट पुष्करवर वार करीत त्याने हल्ला चढविला. त्याने पुष्करच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले. क्लासमध्ये हल्ला होत असताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत पुष्करला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही- कुटूंबियाची भूमिका
पुष्करला तीन ते चार दिवसांपूर्वी टोळक्याने मिळून मारहाण केली होती. त्याची माहिती शिक्षकांनी मला दिली असती तर, एकुलता एक मुलगा माझ्यासोबत असता. माझ्यावर आलेली वेळ कोणावरही येउ नये. पोलिसांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुष्करच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, जोपर्यंत हल्लेखोराला अटक करणार नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका शिंगाडे कुटूूंबियांनी घेतली होती.
वर्गात रक्ताचा पाट अन विद्यार्थी विमनस्क अवस्थेत
खासगी शिकवणूकीत शिक्षक शिकवत असताना अचानक हल्लेखोर मुलगा जागेवरून उठला. त्याने सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला. त्यानंतर शेजारीच बसलेल्या पुष्कर शिंगाडे याच्यावर वार करण्यास सुरूवात केली. हल्ल्यात गळ्यासह पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे पुष्कर जागेवरच कोसळला होता. क्लासमध्ये रक्ताचा पाट वाहण्याचे विदारक चित्र पाहून अनेकजण भीतीखाली गेले. पुष्करला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या खुनाला पुर्वीचे वादविवाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वादातून आरोपीने मित्रावर चाकूने वार करून खून केला आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले असून, आणखी तपास करण्यात येत आहे. – रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण




















