महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक जत्रा यांच्या वतीने, हास्यमैफल आयोजित
marathinews24.com
पुणे – रसिकांनी एकत्र येऊन, विनोदांना दाद देत खळखळून हसणे, हा आनंदी जीवनाच्या मूलमंत्राचा प्रत्यय रविवारी (दि.२) आयोजित करण्यात आलेल्या हास्य मैफलीद्वारे आला. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक जत्रा यांच्या वतीने, ही हास्यमैफल आयोजित करण्यात आली होती. मैफलीत मराठी साहित्यातील ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर या कवींनी आपल्या विनोदी कवितांनी एकच धम्माल उडवून दिली.
साखरे महाराज मठात श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा – सविस्तर बातमी
मैफलीचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि आयोजक शिरीष चिटणीस यानी केले. जीवनात आनंदासाठी विनोद आणि हास्याची आवश्यकता विशद केली. मोबाईलचे फोफावलेले अतिरेकी वेड, प्रेमिकांचे चित्रविचित्र चाळे, नोटाबंदीमुळे काळ्या पैसेवाल्यांची झालेली फजिती, नवरा बायकोमधील भांडणे, पावसाळ्यातले खड्डे, दारुड्यांचे वेडाचार, राजकारण्यांचे डाव-प्रतिडाव या विषयांवरच्या विडंबनांनी रसिकांना खळखळून हसवले आणि विचारांना प्रवृत्तही केले.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्रा. सुनील धनगर यानी ‘आपला देश जगातली चौथी अर्थव्यवस्था आहे. परंतु आनंदी देशांमध्ये आपल्या राष्ट्राचा क्रमांक, खालून सहावा आहे’ याची जाणीव श्रोत्यांना करून दिली. त्यासाठी अशा विनोदी कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहून, आनंद दिला-घेतला पाहिजे, असेही त्यानी सांगितले. मैफलीला प्रसिद्ध कवी मकरंद घाणेकर, किरण जोशी आणि वंदना लोखंडे या उपस्थित होत्या. पुणे पुस्तक जत्रेचे आयोजक पी.एन.आर. राजन यानी आभार मानले.





















