महिलेची २९ लाख, तरूणाची १७ लाखांची ऑनलाईन फसवणूक
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडींग परताव्याचे आमिष पडले महागात : शेअर ट्रेडींगमध्ये गुंंतवणूक केल्यास जादा परताव्या देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणेकरांना घेरले आहे. दिवसाआड होणार्या ऑनलाईन लुटीमुळे नागरिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. मात्र, वारंवार पोलिसांकडून जनजागृती करूनही उच्चशिक्षितही सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. अशाच दोन घटनांत सायबर चोरट्यांनी तब्बल ४६ लाखांची ऑनलाईन लुट केल्याच्या घटना शिवाजीनगर आणि खराडी परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला गंडवले – सविस्तर बातमी
शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची २९ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना २१ एप्रिल ते २० जून २०२५ कालावधीत शिवाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला सायबर चोरट्यांनी फोन करून विश्वास संपादित केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे सांगितले. त्यानुसार काही रक्कम महिलेच्या बँकखात्यात वर्ग केली. विश्वासानंतर महिलेने अवघ्या दोन महिन्यात २९ लाख रूपये जमा केले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत.
दुसर्या घटने सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने खराडीत राहणार्या एकाची तब्बल १७ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ३ जुलैला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खराडीत घडली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारक चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, सायबर चोरट्यांनी त्याच्यासोबत संपर्क साधला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार तरूणाने १७ लाख रूपये संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्यानंतर त्यांनी संबंधिताला संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करीत आहेत.