मुळशी तालुक्यातील सुसगाव पारखेवस्ती परिसरातील घटना
marathinews24.com
पिंपरी – स्पीडब्रेकर कमी करण्यावरून झालेल्या वादातून तेरा जणांनी मिळून दोन जणांना लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरात घडली आहे. तर याच्या परस्पर विरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
तब्बल ४६ लाख ५० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात – सविस्तर बातमी
पहिल्या गुन्ह्यात गणेश एकनाथ पारखे (वय ३२, पारखेवस्ती, सुसगाव, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य महिला व अल्पवयीन बालकांसह एकूण १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरगम महेंद्र ससार (वय ३६, पारखेवस्ती, सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारखेवस्ती ते बांदलवस्ती दरम्यान सार्वजनिक रस्त्यावरील स्पीडब्रेकर जेसीबीने कमी करण्यावरून वाद झाला. आरोपींनी एकत्र येऊन महेंद्र राम ससार व अशोक भास्कर कादे यांना दगड, स्टील दांडे आणि लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली.
याच्या परस्पर विरोधी दक्ष राजेंद्र पारखे (वय १७, सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र राम ससार, सरगम महेंद्र ससार, उमा भास्कर कादे, अशोक भास्कर कादे (सर्व रा. सुसगाव, पुणे) यांच्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने स्पीडब्रेकर काढत असताना साक्षीदारांनी विरोध केला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महेंद्र ससार याने दगड फेकून साक्षीदारांच्या डोक्यात मारहाण केली तसेच दवाखान्यात जाताना त्यांना अडवले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.



















