बीडमधून मजुराची सुटका
marathinews24.com
पुणे – ऊसतोडणीला न आल्याने मजुराचे अपहरण करणारे अटकेत – ऊस तोडणीसाठी उचल घेतल्यानंतर कामासाठी न आल्याने मजुराला मारहाण करनु त्याचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. मजुराचे अपहरण करणाऱ्या तिघांना चंदनगर पोलिसांनी बीडमधून अटक केली. आरोपींच्या तावडीतून पोलिसांनी मजुराची सुटका केली.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी
गौतम केरूजी पोटभरे (वय ३७) अभिजित वसंत पोटभरे (वय २७, दोघे रा. राजेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड), शुभम वासुदेव मायकर (वय २५, रा. मुकेंडे पिंपरी, राजेवाडी,, जि़ बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ऊसतोड मजुराच्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिचा पती सध्या चंदननगर भागात राहायला आहेत. ते मूळचे जालना जिल्ह्यातील भाचेगाववडी येथील आहेत. चार महिन्यांपूर्वी ते पुण्यात आले आहेत. तक्रारदार महिलेचा पती वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एकाच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. ३० जून रोजी तो कामावर गेला होता. दुपारी चारच्या सुमारास पतीने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘मला डांबून ठेवले आहे. तू दोन लाख रुपये जमव. तुझ्याकडे दोघे जण येतील. त्यांना पैसे दे. पैसे न दिल्यास मला सोडणार नाहीत’, असे पतीने तिला सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे अपहरण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले.
सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर आणि पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी आणि तक्रारदार महिलेचा पती बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, पोलिस कर्मचारी शिंदे, लहाने आणि पथक २ जुलै रोजी माजलगावला पोहोेचले. धारुर तालुक्यातील भोगलवाडी भागातील शेतामध्ये आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई करुन अपहरण करण्यात आलेल्या मजुराची सुटका केली.
आरोपी पोटभरे, मायकर यांना अटक केली. तक्रारदार महिलेच्या पतीने ऊसतोडणीसाठी १ लाख ७० हजार रुपयांची उचल घेतली होती. उचल घेतल्यानंतर तो कामावर गेला नव्हता. त्यामुळे आरोपी त्याच्यावर चिडले होते. आरोपीने त्याच्याकडे पैसे मागितले होते. त्यानंतर आरोपींनी त्याचा शोध घेतला. वडगाव शेरी भागातून त्याचे अपहरण करण्यात आले होते. सहायक निरीक्षक बाबर तपास करत आहेत.
कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून रोकड चोरी
सिंहगड रस्ता भागातील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी एक लाख १६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे एका कुरिअर कंपनीत कर्मचारी आहेत. सिंहगड रस्त्यावरील फनटाईम चित्रपटगृहाशेजारी कुदळे टाॅवर्स इमारतीत कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख १६ हजार ६०० रुपये चोरून नेले.