इंदापूर तालुक्यात कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ
marathinews24.com
पुणे – कृषी यांत्रिकीकरण ही केवळ योजना नसून शेतीतील प्रगतीचा पाया आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीचा लाभ देऊन शेती उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे, कृषी मजुरांची टंचाई दूर करणे व वेळेची बचत करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा आधुनिक कृषी उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करून शेतात परिवर्तन घडवावे, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
आपली बारामती, आपली माणसं ग्रुपची सामाजिक बांधिलकी – सविस्तर बातमी
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर इंदापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५१ अनुदानित ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरचलित ८ यंत्र व औजारांचे वितरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, लाभार्थी शेतकरी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल कृषी मंत्री भरणे यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले.
कृषी मंत्री भरणे म्हणाले, “आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उत्पादन खर्चात घट होईल, शेती अधिक फायदेशीर बनेल आणि तरुण पिढीला शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. इंदापूर तालुक्यातील एकूण २३ हजार ५९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली असून त्यापैकी ९,८२१ लाभार्थी ट्रॅक्टरसाठी निवडले गेले आहेत. १,००३ लाभार्थ्यांनी ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे अपलोड केली होती, त्यापैकी ३२६ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली असून आज ५१ लाभार्थ्यांना अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १३,७७६ लाभार्थ्यांची ट्रॅक्टरचलीत यंत्र व औजारांसाठी पात्रता निश्चित झाली असून त्यापैकी आज ८ औजारांचे वितरण झाले आहे. प्रथम टप्प्यातील वितरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ट्रॅक्टर व औजारे बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री भरणे म्हणाले, “दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा नवा अध्याय ठरेल. या उपक्रमामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधनांचा लाभ मिळणार असून शेती अधिक गतिमान, उत्पादनक्षम आणि नफा देणारी बनेल. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी नेहमीच नव्या प्रयोगशीलतेसाठी ओळखले जातात. आता कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून आपण आपला तालुका राज्यातील आदर्श तालुका बनवू शकतो. तरुणांनी अधिकाधिक कृषी शिक्षण घेऊन नवनवीन प्रयोग करावेत आणि शेती क्षेत्रात प्रगतीचे नवे आदर्श निर्माण करावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.



















