अल्पवयीनासह साथीदारांकडून कोयत्याचा वापर
marathinews24.com
पुणे – अल्पवयीनासह टोळक्याने दुचाकीस्वार तरूणावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर तीन रिक्षांच्या काचा फोडून चार ते पाच दुचाकी खाली पाडून नुकसान केले. ही घटना २९ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास विमानतळ परिसरातील कलवड वस्तीजवळ खेसे पार्क कॉर्नर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
शेअर ट्रेडींगचे आमिष पडले ३३ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हे २९ ऑक्टोबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास भावासोबत दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी खेसे पार्क कॉर्नरजवळ टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. कोयत्याने तक्रारदार यांच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर टोळक्याने परिसरातील तीन रिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर इमारतीखालील ५ दुचाकी खाली पाडून तोडफोड करीत नुकसान केले आहे. दरम्यान, तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.
अल्पवयीनाकडून कोयत्याचा वापर
शहरात कुख्यात टोळ्यांतील गुंडांनी दहशत निर्माण केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आता अल्पवयीनाकडून कोयत्याचा वापर करीत सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. प्रामुख्याने रस्त्यालगत पार्क वाहनांची तोडफोड करणे, दुचाकींचे नुकसान करीत दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे आरोपींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.





















