कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा
marathinews24.com
पुणे – नागरिकांनो, तुमची सुरक्षितता तुम्हालाच करावी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण पुण्यातील विविध भागात टोळक्याचा सुरू असलेला धांगडधिंगा संपुष्टात आणण्याचे काम पुणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. प्रामुख्याने कोयता गँगचा राडा, दुचाकीस्वार चोरट्यांचा हैद्रोस, वाहन तोडफोड करणार्या रायझिंग गँग, टोळीयुद्धातून होणारे फायरिंग, दिवसाढवळ्या सपासप वारसह विविध गंभीर घटना पोलिसांच्या कामगिरीचा आरसा दाखवत आहेत. त्यामुळे जागे व्हा जागे व्हा, पुणे पोलिसांनो जागे व्हा, अशी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापे – सविस्तर बातमी
बोटावर मोजता येणार्या कोयता गँगने नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण केली असून, अशा टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना कारवाईचा मुर्हूत काढावा लागत आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. संबंधित टोळ्यांचे रेकॉर्ड काढेपर्यंत सराईत टोळ्यांमधील गुन्हेगारी उफाळून येत आहेत. भरदिवसा गोळीबार करीत कोयत्याने वार करणे, ही सराईतांची आता नवी ओळख बनली आहे. मात्र, एवढ्या गंभीर घटना घडूनही मुरलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुन्हेगारांची नांगी ठेचण्यास आणि वचक निर्माण करण्यास मागील काही दिवसांपासूनव कमी पडले आहेत. त्याचत हद्दीत बदलेले वरिष्ठ अधिकारी, नव्याने हजर झालेले अधिकारी, भ्रष्टाचारात अडकेले पोलिसिंगमुळे गुन्हेगारांचे फावले आहे. त्यामुळे त्यांना वाट्टेल तेव्हा कोयते, गोळीबार, खून, खूनाचा प्रयत्नाद्वारे नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे.
शहरात पोलिसिंगलाच खो बसल्यामुळे रस्त्यावर गुन्हेगारांची चलती आहे. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारांकडून दरदिवशी पुणेकरांचा लाखो रूपयांचा खिसा रिकामा केला जात आहे. दिवसाला साधारणपणे १०० हून अधिक तक्रारी अर्ज सायबर पोलीस ठाण्यात दाखल केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र,कर्मचारी-अधिकार्यांची वाणवा असल्यामुळे बोटावर मोजता येणार्या प्रकरणांचा तपास वेगाने होत आहे. इतर तपासाला सायबर पोलिसांकडे वेळच नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर गुन्हेगारांनी वेढले, ऑनलाईनरित्या सायबर चोरट्यांनी घेरले, अशा स्थितीत अनेकजण आहेत. त्यातच दहशतीसाठी वाहन तोडफोडीच्या घटनांसह अॅसिडफेकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसानही केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून दिल्या जाणार्या सुरक्षिततेच्या हमीला बट्टा लागला आहे.
जनता वसाहतीत कोयत्याने वाहनांची तोडफोड
दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करीत सराईत टोळीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यातील विविध भागात कोयतागँग धुडगूस घालत आहे. त्यानंतर आता कोयता गँगने सर्वसामान्य नागरिकांनी वाहने लक्ष्य केली आहे. कोयताधारी टोळक्याने मध्यवर्ती जनता वसाहतीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरूवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. टोळक्याने घातलेल्या हैदोसात दुचाकी, चारचाकी, टेम्पोचे नुकसान झाले आहे.
महिला सुरक्षिततेचेही बारा वाजले
महिला सुरक्षिततेत कोणतीही कसर सोडणार नसल्याचा दावा करणार्या पुणे पोलिसांवर दुचाकीस्वार सोनसाखळी चोरटे शिरजोर झाले आहेत. रस्त्याने पायी जाणार्या महिलांचा पाठलाग करून दागिने हिसकावले जात आहेत. जेष्ठ महिलांना मोफत राशन आणि रोकडचे आमिष दाखवून हातचलाखीने दागिने लंपास केले जात आहेत. एकंदरीत मागील महिन्याभरात पुण्यात कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघत असतानाच, महिला सुरक्षिततेचेही बारा वाजले आहेत.
इंटेलिजन्सच्या कमतरतेची बोंबाबोंब
गंभीर गुन्हा आणि घटना घडून गेल्यानंतर हद्दीतील पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना जाग येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या ह्युमन इंटेलिजन्सवर संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हा घडल्यानंतर हिंदी चित्रपटाप्रमाणे ऐटीत एन्टी करणार्या पोलिसांनी स्वतःला पारखण्याची गरज आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर घटना घडतात कशा, पोलिसांचा गुन्हेगारांवर वॉच नाही का, सराईत टोळ्यांवरील सर्व्हेलन्स कमी झाला काय, गुन्हेगारी कमी होण्यासाठी विशेष उपाययोजना का अंमलात आणल्या जात नाहीत, याचा जाब नागरिकाने विचारण्याआधी पोलिसांनी कामगिरीत सुधारणा घडवण्याची गरज आहे.






















