२०० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा
marathinews24.com
सातारा – जलसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण; ५० हेक्टर क्षेत्राला होणार लाभ – जागतिक संवर्धन दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील बावडा गावात ‘रि अॅश्युअर २.०’ प्रकल्पाअंतर्गत जलसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत माती नाला बंधाऱ्याची दुरुस्ती करून जलपूजन, हस्तांतरण आणि वृक्षारोपण यांचे आयोजन करण्यात आले होते. ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत, तसेच ‘नॅबफाउंडेशन’ यांच्या सह- वित्तीय सहाय्याने आणि ‘वनराई’ या तिन्ही संस्थांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. भूजल पातळी वाढवणे, शाश्वत शेतीस चालना देणे आणि पर्यावरणीय समतोल साधणे हे प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट असून, यामुळे गावातील ५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून सुमारे २०० शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ – सविस्तर बातमी
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमास मार्गदर्शन केले व सदिच्छा दिल्या. यामध्ये ‘उज्जीवन बँके’चे रिजनल मॅनेजर (सस्टेनेबल बँकिंग)-वैभव भगत, आरईसी हेड व रिजनल मॅनेजर-पंकज केसारवाणी, स्टेट हेड व रिजनल मॅनेजर-कृष्णकांत राणे, रिजनल मॅनेजर(ऑपरेशन्स)-अमोल भामरे, रिजनल आयटी मॅनेजर-नितीन मंदावडे, मॅनेजर (सस्टेनेबल बँकिंग)-योगेश गुरदाळकर, ब्रँच मॅनेजर-अमोल गुरव, एरिया मॅनेजर-राजय निकम, ‘वनराई’चे सचिव अमित वाडेकर, वनराई प्रतिनिधी सुरेश फडके, आकाश शेडगे, ‘नॅबफाउंडेशन’च्या सचिव आदिती शुक्ला व अली बेग, यांचा सहभाग होता. तसेच खंडाळा तालुक्याचे तहसीलदार योगेश पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी संदीप गुलगुले आणि सातारा जिल्हा परिषदेचे सभापती मनोज पवार यांचीही उपस्थिती लाभली.

गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, ग्रामपंचायतीचे सहकार्य, ‘वनराई’चे तांत्रिक मार्गदर्शन तसेच ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ व ‘नॅब फाउंडेशन’च्या सामाजिक बांधिलकीमुळे हा उपक्रम लोकसहभागातून जलसंवर्धनासाठी एक आदर्श ठरला आहे. शाश्वत जल व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल शेतीतील उत्पन्नवाढीसाठी, स्थलांतर रोखण्यासाठी आणि भविष्यातील पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



















