सोकावलेले बिबटे मानववस्तीत स्थिरावले…

मुले-महिलांसह शेतकर्‍यांवरील हल्ले वाढले

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील विविध ठिकाणांवर आता बिबट्यांचा मोकाट वावर शेतकर्‍यांसह स्थानिकांच्या उठला आहे. विशेषतः शाळकरी मुले-मुली, कामगार महिला, रानावनात वस्तीवरील लोक जीव मुठीत धरून राहत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नुकताच अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरखेडमध्ये घडली आहे. त्यातच गुरं-ढोरांसह कामगार महिला पुरूषांवर बिबट्याचे वाढते हल्ले नित्याचेच झाले आहेत. कधीकाळी जुन्नर भागात दिसणारे बिबटे आता दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यात दिसू लागले आहेत. सोकावलेल्या बिबट्याची धाव मानवस्तीवर पोहोचली आहे. त्याला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

कोरेगाव पार्क, बोपोडी जमीन व्यवहाराचा तपास आथिक गुन्हे शाखेकडे – सविस्तर बातमी

गावोगावी उस पिकांचे क्षेत्र वाढीस लागल्यामुळे हिंस्त्र असलेल्या बिबट्याला लपण्याची मोठी जागा उपलब्ध झाली आहे. प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड भागात भक्ष्याच्या शोधात हिंडणारा बिबट्या सर्रासपणे शेतकर्‍यांच्या घराजवळ पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हालचाली वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. कुत्रे, कोंबड्या, जनावरे ओढून नेत बिबट्याकडून शिकार केली जात होती. तोपर्यंत शेतकर्‍यांकडून फारसे लक्ष दिले जात नव्हते. मात्र, हळूहळू बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर भक्षासाठी बिबट्यांकडून थेट मानवावरील हल्ले वाढीस लागले. कधी शेतात पिकांना पाणी देणारा शेतकरी, तर कधी एकटी मजूर असलेली महिलेवर हल्ला करीत बिबट्याचा हिस्त्रपणा दिसून आला. गावपातळीवर चर्चा तालुक्यापर्यंत पोहोचली गेली. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली नाही.

बिबट्याचे जन्मप्रमाण मोठे असून, दर तीन महिन्यांनी मादी पिल्लांना जन्म देते. त्यामुळे दरवर्षी बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच एका गावात पकडलेला बिबट्या दुसर्‍या गावच्या वेशीलगतच्या वनक्षेत्रात नेउन सोडण्याची जबबादारी वनविभागाकडून पार पाडली जाते. त्यामुळे पुन्हा भक्षाच्या शोधार्थ संबंधित बिबट्यांचा हिस्त्रपणा अधिकच वाढत गेल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यांच्या अधिवासासाठी कायमस्वरूपी सोय करण्यात वनविभागाला अजूनपर्यंत यश आले नाही. डोंगराळ वन भागात वन्यप्राण्यांचे प्रमाण घटले असून, अन्नाच्या शोधार्थ हिस्त्र प्राण्यांनी मानववस्तीकडे चाल केली आहे. त्यामुळे कधीकाळी रात्रीच्या सुमारास दिसणारे बिबटे आता दिवसाढवळ्या मुलांवर हल्ले करीत आहेत. मोलमजुरी करणार्‍या महिलांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या धोरणाबाबत प्रचंड राग व्यक्त केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अल्प भू-धारक असलेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातच खेड, लोणी धामणी, मंचर, आंबेगाव, शिरूर परिसरात उसासह इतर नगदी पिकांचे उत्पादन शेतकर्‍यांकडून घेतले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून बिबट्यांकडून मानवावरील होणारे हल्ले वाढल्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीजेच्या लपंडावामुळे शेतकर्‍यांना रात्रीच्या सुमारास पिकांना पाणी देण्याची वेळ येते. मात्र, उसाच्या बांधालगत बिबट्याकडून सावज हेरले जात असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. एकीकडे बिबट्याची धास्ती दुसरीकडे पाण्याविना पिकांचे होणारे नुकसान शेतकर्‍यांना भुर्दंडाकडे नेत आहे. तर शालेय मुले-मुलींसह महाविद्यालयीन तरूण-तरूणींनाही दिवसाढवळ्या चालत जावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. कारण वाटेवरून कधी बिबट्याची झडप अंगावर पडेल, याचा नेम राहिला नाही.

वनविभागाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता

पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत वनविभागाच्या वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे जागे झालेल्या विभागाने हालचाल करीत संबंधित बिबट्याला ठार मारले. मात्र, त्यानंतरही बिबट्याचा हैदोस सुरूच असून, ठिकठिकाणी बिबट्याची झुंड नागरिकांना दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचे मानवावरील हल्ले गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दिवसाआड बिबट्यासह बछड बिनधक्कपणे शेतात फिरताना दिसून येत आहेत. त्यांच्या हालचालींवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी ठोस भूमिका घेणेही गरजेचे बनले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×