सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत तक्रारदार नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. येरवडा भागातील एका महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी सहा लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
भेटवस्तू पाठविण्याचे आमिष; महिलेची पावणे तीन लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या महिन्यात संपर्क साधला होता.‘ परदेशातून एका कुरिअर कंपनीने पाठविलेले पाकिट विमानतळावर जप्त करण्यात आले आहे. या पाकिटात अमली पदार्थ सापडले असून, कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे पाठवावी लागतील’, अशी भीती चोरट्यांनी महिलेला दाखविली होती.
‘याप्रकरणात अटक हाेण्याची शक्यता असून, तातडीने ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करा,’ असे चोरट्यांनी महिलेला सांगितले होते. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात सहा लाख १५ हजार रुपये जमा केले. महिलेने याबाबत चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तपास करत आहेत.
सक्त वसुली संचालनालय (ईडी),अमली पदार्थ विरोधी पथक (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) अशा यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील अनेकांची फसवणूक केली आहे.





















