ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुडगूस
marathinews24.com
पुणे – दिवाळीच्या निमित्ताने घरी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढली असल्यामुळे पीएमपीएल बससह एसटी प्रवासात गर्दी होत आहे. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करीत दागिने चोरून नेले जात आहेत. अशाच दोन घटना वारजे माळवाडी ते खडकी असा पीएमपीएल बसप्रवास आणि हडपसर एसटी स्थानकावर घडल्या आहेत. त्यानुसार याप्रकरणी खडकी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिमोट अॅक्सेसद्वारे घातला ९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पीएमपील बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील २ लाख ५८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेचार ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी ते खडकी असा बसप्रवास करताना घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार एन. टी. पवार तपास करीत आहेत.
हडपसर परिसरातील एसटी स्थानकातून गावी जाणार्या एका महिलेच्या पर्समधील १ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना १९ ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसरमधील रवीदर्शन स्टॉपवर घडली आहे. याप्रकरणी शेवाळेवाडीत राहणार्या २९ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार शिंगाडे तपास करीत आहेत. दरम्यान, गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. विशेषतः महिलांना टारगेट करून त्यांच्या पर्समधील दागिने चोरून नेले जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.





















