101 नाट्यपदांचे सादरीकरण : अश्विनी स्वरालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
marathinews24.com
पुणे – पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अश्विनी स्वरालयतर्फे सादर करण्यात आलेल्या 101 नाट्यपदांच्या ‘नाट्य स्वर यज्ञ’ या विशेष कार्यक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आली आहे. नाट्यसंगीत क्षेत्र तसेच रसिकांच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरलेला हा क्षण अनेक पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनुभवला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा २०२५’- सविस्तर बातमी
अश्विनी स्वरालयतर्फे रविवारी ‘नाट्य स्वर यज्ञ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 22 संगीत नाटकातील तब्बल 101 नाट्यपदे कलाकारांनी सादर केली. अश्विनी गोखले, निनाद जाधव, धनश्री खरवंडीकर, संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर तसेच स्वरालयातील 8 ते 80 वयोगटातील 65 विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. सकाळी 9 वाजता सुरू झालेला ‘नाट्य स्वर यज्ञ’ सायंकाळी 7 वाजता संपला. संजय गोगटे, हिमांशु जोशी (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे, केदार परांजपे (तबला), अश्विनी गोखले, कार्तिकी वझे (संवादिनी), वसंत देव (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली तर वर्षा जोगळेकर, अनुपमा कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या संगीत नाट्य क्षेत्रातील कार्याचा आढावा सादर केला.
एकाच कार्यक्रमात 22 मराठी संगीत नाटकातील 101 पदे सादर केली गेली या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाल्याची घोषणा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे प्रतिनिधी अशोक अदक यांनी कार्यक्रमानंतर केली आणि अश्विनी स्वरालयाच्या संचालिका अश्विनी गोखले यांना प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदान केले.
मराठी संगीत नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार,-गायिका पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अश्विनी स्वरालयातर्फे सादर केलेल्या 101 नाट्यपदांचा ‘नाट्य स्वर यज्ञ’ हा कार्यक्रम गौरवास्पद असून यात स्वरालयातील 65 विद्यार्थ्यांचा सहभागासह पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या शिष्यांनी सादर केलेली नाट्यपदे हा मोठा सांस्कृतिक ठेवा ठरणार आहे, असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे प्रतिनिधी अशोक अदक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् हे आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् यांच्याशी संलग्न असून भविष्य काळात अश्विनी स्वरालयातर्फे आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्साठी प्रयत्न केले जावेत. जेणे करून मराठी संगीत नाटकांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असे अदक या वेळी शुभेच्छा देताना म्हणाले.
कार्यक्रमाची संकल्पना विशद करताना अश्विनी गोखले म्हणाल्या, पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना मानवंदना देण्यासाठी शिष्य या नात्याने ‘नाट्य स्वर यज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा नाट्य स्वर यज्ञ यशस्वी झाला ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. जयमाला शिलेदार यांचा ज्ञानदानाचा वारसा पुढे सुरू रहावा या करिता हा यज्ञ मांडला होता. या कार्यक्रमात लहान मुलांचाही सहभाग असल्याने त्यांनाही नाट्य संगीताची ओळख होऊन गोडी निर्माण झाली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे मराठी संगीत रंगभूमीचा वारसा प्रवाहित राहण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.
रसिकांनी घेतला नाट्यपदांचा आनंद
दिवसभर रंगलेल्या ‘नाट्य स्वर यज्ञ’ या कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून भरभरून आनंद घेतला. सादर झालेल्या नाट्यपदांमधून साकारलेली भावाविष्कार, वातावरण निर्मिती, निसर्ग वर्णन, भक्तीरस निर्मिती यांची स्वरानुभूती रसिकांना भावली. प्रसिद्ध, प्रचलित तसेच क्वचितच ऐकावयास मिळणाऱ्या नाट्यगीतांचे सादरीकरण यात करण्यात आले. नांदीने सादरीकरणाला सुरुवात झाली तर भरतवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली.























