पुजा-अर्चाद्वारे केली जातेय आरास
marathinews24.com
पुणे – नवरात्रोत्सवाची आजपासून लगबग सुरू झाली असून, पुण्यातील विविध देवींच्या मंदीरात भाविकांकडून मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यासाठी आयोजन केले आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातही अनेक देवींची प्राचीन मंदीरे असून, वर्षोनुवर्षे त्याठिकाणी पाद्य-पूजा केली जाते. त्यासोबतच दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. नवरात्री विशेष म्हणजे देवीच्या नऊ रूपांच्या पूजेचा सण आहे. या काळात भाविक-भक्त उपवास करीत देवीची आराधना करतात. विशेषतः प्राचीन मंदीरातील वर्षानुवर्षे सुरू असलेला आरास आजही कायम आहे.
केरळमधील त्रावणकोर राजघराण्याचे युवराज वर्मा यांनी घेतले ‘दगडूशेठचे दर्शन – सविस्तर बातमी
पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेली तांबडी जोगेश्वरी, भवानी पेठेतील भवानी माता, चतुःशृंगी माता, कोथरूडची भवानी माता, तळजाई माता यासह अनेक देवींची मंदीरे फार वर्षापासून प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच अरणेश्वरची पद्मावती देवीही प्राचीन आहे. त्याठिकाणावरील प्रत्येक मंदिराला प्राचीन इतिहास असून, भाविक मोठ्य श्रद्धेने आजही विविध सणांसह नवरात्र साजरी करतात. तसेच सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी देवीचे मंदीरही तितकेच नयमरम्य असून, त्याठिकाणीही आता दरवर्षी नवरात्रामध्ये उत्सव साजरा केला जातो. पुण्यातील विविध देवींच्या मंदीरात नवचंडी होम आणि नवरात्रीचे दर्शन हे नऊ दिवस उत्साहात साजरे केले जातात. तसेच नवरात्रोत्सवात नऊ दिवसात बहुतांश घरात घट बसवून देवींची उपासना केली जाते.
गावोगावी देवीची उपासणा करण्यासोबतच घरोघरी परडीमध्ये किंवा पत्रावळीवर, ताम्हनामध्ये मातीच्या भांड्यात पंचधान्य पेरून उगवले जातात. कलशावर प्रत्येक दिवशी फुलांची एक माळ, अशा नऊ दिवसाच्या नऊ माळा बांधून नवरात्र साजरे केले जाते. सप्तमी, अष्टमीला पापड्या आणि देवीचे दागिने यांचा फुलोरा नैवेद्य दाखवला जातो . घरोघरी श्रीसुक्त, होम, देवीची भजने, देवी महात्म्य वाचून देवीची आराधना केली जाते. नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये देवी भाविकांना दर्शन देते. त्यावेळी वेगवेगळ्या वाहनांवर आरुढ होते. अष्टमीच्या दिवशी देवीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले आहे. शेकडो वर्षांची परंपरा अनेक देवींच्या मंदीराला लाभली असून, त्याठिकाणावरील पारंपारिक केले जाणारे पूजन भाविकांना आपलेसे करते.
पुण्यातील नामांकित देवींची प्राचीन मंदीरे
चतु:श्रुंगी माता मंदिर –
सेनापती बापट रस्त्यावरून पुढे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला चतुःशृंगी देवीचे मंदिर आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण असून, पावसामुळे मंदीर परिसरात दोन्ही बाजूंना हिरवाईने डोंगर नटलेले असतात. त्यामुळे परिसर भक्तांना अधिकच प्रभावित करतो. नवरात्रोत्सवात मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे. संपुर्ण मंदिर लाल विटांनी बांधले असून त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देवीच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लागल्या जातात.
तांबडी जोगेश्वरी-
जवळपास ३०० वर्षापूर्वीचे तांबडी जागेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिरात जागृत देवीची उभी मूर्ती असून ती ताम्र वर्णी आहे. त्यामुळे तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव पडले आहे. त्यासोबतच देवीने ताम्रसुराचा नाश केला म्हणून सुद्धा तांबडी जोगेश्वरी असे संबोधले जाते. मानाची पहिली देवी म्हणून तांबडी जोगेश्वरीचा उल्लेख केला जातो. गणेशोत्सवात देवीच्या मंडळाला पहिल्या पाच मानाच्या पाच गणपती मध्ये स्थान आहे. वर्षानुवर्षे लोक देवीची मनोभावे पूजा करतात. घरातील कोणत्याही शुभकार्याची पत्रिका कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी देवीला अर्पण केली जाते.
दुर्गादेवी मंदिर –
प्रसिद्ध आणि ऐतिहासिक दुर्गादेवीचे मंदिर दत्तवाडी परिसरात असून, माता शक्ती, समर्पण आणि साहसाचे प्रतीक मानली जाते. मंदिराची शिल्पकला आणि स्थापत्यकला आकर्षक आहे. मंदिराचा रांगेत असलेला गर्भगृह आणि भव्य मंडप भक्तांना आकर्षित करतो. नवरात्रोत्सवात विविध उपक्रमासह कार्यक्रमांची रेलचेल असते.
भवानी माता मंदिर –
भवानी मातेचे हे मंदिर भवानी पेठेत असून, प्राचीन मंदिरात नित्य पूजा, अभिषेक, आणि आरती नियमितपणे पार पडते. नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यास प्राधान्य दिले जाते. मंदिरात महापूजा केल्याने इच्छा पूर्ण होते असे बोलले जाते. वर्षभर देवीच्या मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
श्री महालक्ष्मी मंदीर
सारसबागेजवळ श्री महालक्ष्मी मंदीर असून, अतिशय सुबक कला कुसरतेने संगमरवरी दगडात मंदीराची उभारणी करण्यात आली आहे. दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह इतर नाविण्यपुर्ण उपक्रमांद्वारे भाविकांची पाउले देवीच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात. मंदीरात नित्यपूजा पाठ केला जातो. नवरात्रोत्सवात देवीला आभूषणे परिधान केली जातात. यंदाच्यावर्षी दसर्याला देवीच्या अंगावर सोन्याची साडी परिधान केली जाणार आहे. विशेषतः दरवर्षी मंदीरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडते.






















