तब्बल १४ कोटींची केली फसवणूक; मुलींचे आजारपण दूर करण्याचे दाखवले आमिष
marathinews24.com
पुणे – शहरातील एक भोंदू महिलेने कोथरूडमधील संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीची १४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. भोंदू महिलेने अंगात दैवी संचार होत असल्याचे सांगून त्यांच्याकडून गेल्या ७ वर्षात लाखो रुपये उकळले. कोथरूड, इंग्लडमधील घरात दोष असून, त्यांना घर, शेततमीन विकण्यास भाग पाडले. घर विकल्यानंतर नातेवाईकांचे घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज काढण्यास सांगितले. फसवणूक झाल्यचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने पोलीस आयुक्तालायात अर्ज दिला असून, अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील अल्पवयीनाच्या खूनाला पुर्ववैमनस्याची किनार – सविस्तर बातमी
संगणक अभियंत्याने पोलीस आयुक्यालयात तक्रार अर्ज दिला आहे. तक्रारदार संगणक अभियंता कोथरूडमधील उच्चभ्रु सोसायटीत राहायला आहेत. ते एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. पत्नी, दोन मुलींसह ते राहायला आहेत. त्यांची एक मुलगी मतिमंद असून, दुसऱ्या मुलीला दुर्धर विकाराने ग्रासले आहे. आर्थिक बाजू चांगली असताना दोन मुलींची प्रकृती चांगली नसल्याची खंत संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीला होती. २०१८ पासून दोघे जण भजनी मंडळात जायचे.
भजनी मंडळातील नागरिकांना त्यांच्या मुलींच्या आजार पणाविषयी माहिती होती. त्यांनी संगणक अभियंत्यांची दीपक खडके नावाच्या व्यक्तीशी ओळख करुन दिली. त्यानंतर दीपक खडके यांनी वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि तिचे पती कुणाल यांच्याशी ओळख करुन दिली. ‘वेदिका ही एका बाबांची लेक आहे. तिच्या अंगात बाबांचा संचार होतो’, असे खडके यांनी संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीला सांगितले. वेदिका तुमच्यावरील सर्व संकटे दूर करतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वेदिकाने संगणक अभियंत्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीची माहिती तिने घेतली. त्यानंतर वेदिकाने दोन मुलींना घेऊन दीपक खडके यांच्या दरबारात बोलाविले.
तिने अंगात संचार आल्याचा बहाणा केला. अंगात संचार आल्याचा बहाणा करुन २०१९ ते २०२१ या कालावधीत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवू नका, असे सांगून तिने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. संगणक अभियंत्याने बँकेतील ठेवी माेडून तिच्या खात्यात खात्यात पैसे जमा केले. मुलींचा आजार गंभीर असून, आजार बरा होण्यास वेळ लागेल, असे सांगितले. त्यानंतर मुली बऱ्या न झाल्याने संगणक अभियंत्याने विचारणा केली. तेव्हा तुमच्या घरात दोष आहे. घरातील दोषामुळे मुली बऱ्या होत नसल्याचे सांगितले. ‘तु्म्ही घर विक्री करा. ही रक्कम तुमच्याकडे ठेऊ नका. ही रक्कम आमच्या खात्यात जमा करा. ही रक्कम घरात ठेवल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, असे बाबांनी आम्हाला सांगितले आहे’, असे तिने त्यांना सांगितले. २०२२ मध्ये त्यांनी कोथरूडमधील घराची विक्री केली. ही रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली. बाबा दर्शन देणार आहेत, असे सांगून तिने संगणक अभियंत्याला इंग्लडमधील घर विक्री करण्यास सांगितले.
संगणक अभियंता राहत असलेली आणखी एक सदनिका, शेतजमिनीत दोष असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी कोथरुडमधील आणखी एक सदनिका, इंग्लडमधील घर, शेतजमिनीची विक्री केली. पाॅलिसीत गुंतविलेली रक्कम त्यांनी तिला दिली. त्यानंतर आणखी रक्कम मागितली. मुली बऱ्या होतील, या आशेने त्यांनी भावाचे घर तारण ठेवून पैसे दिले. गेल्या सात वर्षात वेदिका, तिचा पती आणि साथीदारांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंत्याने पोलीस आयुक्तयालयात नुकताच तक्रार अर्ज दिला. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने म्हणाले, ‘याप्रकरणाची तक्रार अद्याप कोथरूड पोलीस ठाण्यात आलेली नाही. याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्तालयात देण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने विविध बाबी तपासण्यात येत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.























