कवी शशिकांत तिरोडकर यांच्या ‘मिठी’ नंतरच्या कविता संग्रहाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – मातृभाषा ही आपल्याला जगण्याचे बळ देते त्यामुळे आपण प्रत्येकाने ती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत या सगळ्या माध्यमातून भाषा समृद्ध होत असते, त्यामुळे त्या भाषेत सकस आणि कसदार कलाकृतींची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा ज्येष्ठ कवी, विडंबनकार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी केली.
सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव – सविस्तर बातमी
निमित्त होते कवी शशिकांत तिरोडकर यांच्या ‘मिठी’ नंतरच्या कविता या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचे. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, साहित्यदिप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुटाणे पुढे म्हणाले, दुर्दैवाने आपण मराठी भाषा, मराठी संस्कृती या पासून दूर चाललो आहोत. तंत्रज्ञान आणि एआय यांच्या आहारी जाण्यापासून वाचायचे असेल तर वेळीच योग्य ती पावले उचलायला हवीत. यावेळी फुटाणे यांनी पुण्यावर केलेली एक अप्रतिम कविता सादर केली, उपस्थितांनी त्याला उत्तम दाद दिली.
अशोक नायगावकर यांनी आपल्या मनोगतात सध्या भाषा आणि कवितेचा होत असलेला ऱ्हास याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, कविता लोप पावत चालली आहे; त्यामुळे जगण्यातला स्पर्श हरवला आहे. कवितेइतके चिरंतन जगात दुसरे काहीच नाही, त्यामुळेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे अभंग, कविता आजही अजरामर आहेत. माणूस दिवसेंदिवस कोरडा होत चालला आहे. कवितेपासून दूर जाणे म्हणजे जगण्यापासून दूर जाणे आहे.
शशिकांत तिरोडकर म्हणाले, कवितेचे दोनच प्रकार मी मानतो. अभिजनांची दुर्बोध वाटणारी कविता आणि रसिकांशी बोलणारी सुबोध सुंदर कविता. खरी कविता तीच जी एकाचवेळी लाखो लोकांशी बोलते. माझा जन्म निसर्ग संपन्न अशा कोकणातला. कोकण म्हणजे ‘परमेश्वरा ची अद्भुत रंगपेटी’ त्यामुळे सहाजिकच निसर्गाचे विविध रंग माझ्या कवितांमध्ये येतात. त्यामुळे कविता झऱ्या सारखी सहज येते आणि रसिकांना सहज समजेल अशी लिहिली जाते.
प्रकाशक नितीन हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले तर धनंजय तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कौस्तुभ तिरोडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दिपा सामंत, शशी डांभारे, अभिषेक राऊत, गायत्री श्रीरंग, धनंजय तडवळकर आणि स्वतः शशिकांत तिरोडकर यांनी कवितांचे अप्रतिम सादरीकरण केले. तिरोडकर यांनी सादर केलेल्या ‘आई’ आणि ‘दिवेलागणीची वेळ’ या कवितांनी रसिक भारावून गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विलास कुवळेकर यांनी केले.























