अहिल्यानगर रस्त्यावरील घटना
marathinews24.com
पुणे – मोफत राशन वाटप सुरू असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्यांनी जेष्ठ फळविक्रेत्या महिलेसोबत संवाद साधला. त्यांना गळ्यातील सोन्याचे दागिने, रोकड एका पिशवीत काढायला सांगून हातचलाखीने तब्बल २ लाख ५८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २५ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास विमानतळ परिसरातील नगररोड गर्जे मार्वेâटसमोर घडली आहे. याप्रकरणी खराडीतील थिटे वस्तीवर राहणार्या ८४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला फळविक्रेती असून, २५ मे रोजी नगर रोडवरील गर्जे मार्वेâटसमोर फळविक्री करीत होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे आलेल्या दोघांनी महिलेला मोफत राशन आणि १० हजार रूपयांचे वाटप सुरू असल्याची बतावणी केली. पण तुमच्याकडे दागिने असल्यामुळे मोफत काहीही मिळणार नाही, असे चोरट्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील पिशवी महिलेला देउन तुमचे दागिने आणि रक्कम यामध्ये ठेवा असे सांगितले. विश्वास संपादित झाल्यामुळे महिलेने गळ्यातील दागिने आणि ४१ हजारांची रोकड पिशवीत ठेवली.
महिलेने पिशवीत ऐवज ठेवल्याची संधी साधून चोरट्यांनी हातचलाखी केली. त्यांच्याकडील आणखी एक पिशवी महिलेला देउन ऐवजाची पिशवी स्वतःच्या ताब्यात घेतली. काही वेळानंतर चोरट्यांनी महिलेला आम्ही तुमच्यासाठी राशन घेउन येतो, असे सांगून ऐवज लंपास करीत चोरटे पसार झाले. दरम्यान, महिलेने पिशवी उघडून पाहिली असता, त्यामध्ये दागिने मिळून आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करीत आहेत.





















