जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
marathinews24.com
पुणे – पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाकडेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी – सविस्तर बातमी
रिद्धेश विनय शिंदे (वय २१, रा. शिंदे निवास, जयभीमनगर, दापोडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत रिद्धेशचे वडील विनय (वय ४५) यांनी खडकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धेश हा ‘बीएससी (माहिती-तंत्रज्ञान) पदवी परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला होता. तो समाज माध्यमात शाॅर्ट फिल्म प्रसारित करायचा. शाॅर्ट फिल्मच्या काम आटोपून तो १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन दापोडीकडे निघाला होता. वाकडेवाडीतील भुयारी मार्ग परिसरातून पीएमपी बस दापोडीकडे निघाली हाेती.
‘पीएमपी बस ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्न दुचाकीस्वार रिद्धेश याने केला. त्या वेळी पीएमपी बस वळताना धक्का लागला. दुचाकीस्वार रिद्धेश दुभाजकावर आदळला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिद्धेश याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला’, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे यांनी दिली. उपनिरीक्षक दिघे तपास करत आहेत.


























