दोन नृत्यांगणांसह आयोजकांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नृत्यांगणा राधा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच धनकवडी परिसरात मंडळांनी विनापरवाना लावणी कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या प्रकरणात लावणी नृत्यांगणांसह सहकलाकार, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन – सविस्तर बातमी
धनकवडीतील तीन हत्ती चौकात अष्टविनायक मित्र मंडळाकडून शनिवारी (५ सप्टेंबर) रोजी दहीहंडी उत्सवात नृत्यांगणा निशा मुंबईकर यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. दहीहंडी उत्सवात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली होती. कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. कार्यक्रमासाठी परवानगी मिळण्याकरिता पोलिसांकडे पद्धतीनुसार अर्ज सादर करावा लागतो. मात्र, कार्यक्रमाचे आयोजक किंवा कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगना, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष पवन सूर्यकांत डोंगरे, सागर साेनवणे, नृत्यांगणा निशा मुंबईकर, सहकलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राहुल राठोड यांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक मिठारे तपास करत आहेत.
दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी धनकवडीतील रिस्की बाॅईज ग्रुपचे (शिवराज मित्र मंडळ) अध्यक्ष बंडू मडीवाल, उपाध्यक्ष मयूर भावेकर, नृत्यांगणा शुभांजली उर्फ शुभांगी थोरात यांच्यासह चार नृत्यांगणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाराध्ये तपास करत आहेत.
दारुच्या नशेत पोलीस हवालदाराने केला तरुणीचा विनयभंग – हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश
दारूच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. पाेलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले. बबन अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. वाघ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. वाघ १७ जुलै २०२६ पासून कोणतीही सूचना न देता कामावर गैरहजर होता. ४ सप्टेंबर रोजी त्याने दारूच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. याबाबतचा अहवाल चतु:शृंगी पोलिसांनी अहवाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांच्याकडे पाठविला.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांना कळविण्यात आली. वाघ याच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून पोलीस उपायुक्त रावले यांनी त्याला निलंबित केले.




















