शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरीचे आमिष; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ससून रुग्णालयात शिपाई पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शाम अशोक खैरे, दीपाली शाम खैरे (दोघे रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लष्कर भागातील दस्तूर शाळेजवळ राहायला आहे. आरोपी दाम्पत्याशी त्याची गेल्या वर्षी ओळख झाली होती. दाम्पत्याने तरुणाला ससून रुग्णालयात शिपाई पदावर कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तरुणाकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये रोख आणि ऑनलाइन पद्धतीने घेतले. तरुणाने नोकरीबाबत आरोपी दाम्पत्याकडे विचारणा केली. तेव्हा दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.




















