पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पिंपरी – बॅनर लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रामनगर, चिंचवड येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय राजु कापसे (रा. मोहननगर, चिंचवड), समीर ऊर्फ सम्या उत्तम गवळी (वय १९, रा. काळेवाडी), मोन्या ऊर्फ शशांक अनंत लांडगे (वय १९, रा. मस्के वस्ती, रावेत), शिवा बाबासाहेब बनसोडे (वय १९, रा. आंबेडकरनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करून समीर, शशांक आणि शिवा या तिघांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा मुलगा समीर जाधव याचे दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपींशी बॅनर लावण्यावरून बाचाबाची झाली होती. या कारणामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व पालघन सारखे हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
साईड न दिल्याच्या रागातून बस चालकाला कोयत्याने मारहाण
पिंपरी : मोटारकारला साईड न दिल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका बस चालकाला मारहाण केली आणि कोयत्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना तळेगाव-चाकण रोडवर ओम लॉजिस्टीक कंपनीजवळ बुधवारी घडली. याप्रकरणी गणेश रामेश्वर हारदे (वय २४, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जळबा बिजले उर्फ जब्या (वय २१, रा. बालाजीनगर, चाकण), शुभम सोमेश्वर मुंगळे उर्फ शुभ्या वाय झेड (वय २१, रा. नाणेकरवाडी) व इतर दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून अविनाश आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी हे ॲप्टिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी बस घेऊन जात असताना आरोपींनी त्यांच्या कारला साईड न दिल्याच्या कारणावरून बस अडवली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी अविनाश याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. फिर्यादीने हात मध्ये टाकल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांना दुखापत झाली. आरोपींनी कोयता-दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
ईडीने संलग्न केलेली मालमत्ता ४ कोटी ८४ लाखांना परस्पर विकली
पिंपरी : अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संलग्न केलेली मालमत्ता एका महिलेने ४ कोटी ८४ लाखांना विकली. शासनाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे गाव येथे फेब्रुवारी महिन्यात घडला आहे. याप्रकरणी शैलेंद्रकुमार रविंद्रकुमार गुप्ता (वय ५०, रा. मुंबई) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीड येथील ४४ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निघोजे येथील गट क्र. २७८/०१/बी हा भूखंड ईडीने कायदेशीर आदेशाद्वारे संलग्न केला होता. आरोपी महिलेला या संलग्नतेची लेखी माहिती होती. तरीही आरोपी महिलेने शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही मालमत्ता ४ कोटी ८४ लाख ३८ हजारांना परस्पर विक्री केली. त्याबाबत खेड येथील सहनिबंधक कार्यालयात विक्री करारनामा करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
पतीकडून पत्नी आणि मुलीला धारदार शस्त्राने मारहाण
पिंपरी : तुम्ही तुमचा डबा बांधून घेऊन जा, असे पत्नीने म्हटल्याच्या रागातून पतीने पत्नी आणि मुलीला धारदार शस्त्राने मारहाण केली. ही घटना मंगळवारी महादेवनगर, सुसगांव येथे घडली. याप्रकरणी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष राजु कांबळे (रा. सुसगांव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही घरात स्वयंपाक करत असताना आरोपी पतीला तुम्ही तुमचा डबा बांधून घेऊन जा, अशी म्हणाली. त्याचा राग आल्याने आरोपीने कोणत्यातरी धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यात, डाव्या हाताच्या पंजावर आणि छातीवर मारून गंभीर दुखापत केली. आईला मारहाण होत असताना सोडवण्यासाठी आलेल्या मुलगी ऋतुजा हिलाही आरोपीने कपाळावर व उजव्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई-पुणे हायवे सर्व्हिस रोडवर ‘हिट अँड रन’
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सिम्बायोसिस कॉलेज गेटच्या जवळ सर्व्हिस रोडवर किवळे येथे घडली. भगवान सिंग असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव जगदीश गडरीया (वय २०, रा. बालेवाडी, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञान वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र भगवान सिंग हे क्रिकेटचे ग्राऊंड पाहण्यासाठी पायी चालत जात होते. त्यावेळी फिर्यादी हे लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला गेले. त्यांचा मित्र रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भगवान सिंग यांना धडक दिली. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून लूटमार, वाहनांची तोडफोड
पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून पैसे जबरदस्तीने काढले आणि तीन वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी संजय इंद्रजीत धेडे (वय ५०, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिष ऊर्फ काळया मुकेश राऊत (वय २०, रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने फिर्यादीकडून ८५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याबाबत विचारणा केली असता त्याने कोयत्याने फिर्यादींची किया सोनेट कार, संतोष धुमाळ यांची ऑटो रिक्षा आणि फिरोज पठाण यांचा टाटा चारचाकी टॅम्पो या तीन वाहनांच्या काचा फोडून अंदाजे १० हजारांचे नुकसान केले. तसेच आरोपीने कोयता हवेत फिरवून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.





















