उपभोगवादाच्या वाढत्या प्रभावामुळे समताधिष्ठित विकासाच्या संकल्पना मागे – प्रा. अरुणकुमार यांचे मत
marathinews24.com
पुणे – स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री, समाजवादी नेते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे पूर्व सचिव प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे शनिवारी, ११ ऑक्टोबरला विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. अरुणकुमार, साथी गजानन खातू, झेलम परांजपे, विनोद शिरसाठ, प्रा. सुभाष वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साथी सुभाष वारे यांनी प्रा.सदानंद वर्दे यांचे व्यक्तिमत्व व परिवर्तनवादी चळवळीतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाची माहिती दिली.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मुलींच्या वसतिगृहाचे सोमवारी उद्घाटन – सविस्तर बातमी
ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील माजी प्राध्यापक प्रा. डॉ. अरुणकुमार यांनी ‘पूंजीवाद के विभिन्न चरण और आझाद भारत में उभरती चुनौतियां’ या विषयावर सखोल विवेचन केले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील आर्थिक विकासाचे विविध टप्पे, वाढता भांडवलशाही प्रभाव, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक विषमता तसेच रोजगार, उत्पादन आणि उपभोगाच्या क्षेत्रातील असंतुलन यांचा विस्तृत आढावा घेतला. डॉ. अरुणकुमार यांनी सांगितले की, आजच्या भारतात आर्थिक विषमता वाढत असून लोककल्याणावरुन लक्ष हटवले जात आहे, त्यामुळे समताधिष्ठित विकासाच्या दिशेने नवे विचार आणि चळवळ आवश्यक आहे. बाजार उपभोगवादाला प्रोत्साहन देत असून त्यातून मूलभूत समस्या दुर्लक्षित रहात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते साथी गजानन खातू उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रा. वर्दे यांच्या समाजवादी मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचा आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, प्रा. वर्दे यांचा समाजवादी दृष्टिकोन आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी आणि आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू यांनी केले व आभार राहुल भोसले यांनी मानले.





















