सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
सिंहगड रस्ता परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ७ सप्टेंबर रोजी संपर्क साधला. चोरट्यांनी दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी असल्याची बतावणी केली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात करण्यात आला असून, बँक खात्यातून २२ कोटी रुपयांची रक्कम अन्य खात्यात पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात १५ ते २० दिवसांत चोरट्यांच्या खात्यात आठ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
























