संस्कृती, अध्यात्म आणि विज्ञानाचा त्रिवेणी संगम : देशी गो संवर्धन
marathinews24.com
पुणे – प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना “कामधेनू” असे संबोधण्यात येते. देशासह राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लालसिंधी, खिल्लार, कोकण कपिला, गवळाउ, देवणी, डांगी, आणि लालकंधारी वेगवेगळ्या देशी जातीच्या गाई आढळतात. तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असून ही चिंताजनक बाब आहे.
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ – सविस्तर बातमी
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायीच्या शेण गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्व आणि पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील देशी गोवंश हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. देशी गाय संशोधन प्रकल्पांमध्ये देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लालसिंधी या गाईंच्या जातींचा तुलनात्मक अभ्यास एकाच ठिकाणी करण्यात येतो. देशी गोवंशांचे संवर्धन, पालन आणि संशोधन प्रकल्पामार्फत कार्यान्वित असून अशा प्रकारचे संशोधन करणारे महाराष्ट्रातील हे एकमेव संशोधन केंद्र आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया देशी गो-वंशाविषयी….
सहीवाल गाय मुलतानी, लोला, मोंटगोमेरी, लांबी बार या उपनावाने ओळखले जाते. पंजाब (भारत), मोंटगोमेरी, मुलतान (पाकिस्तान) येथे मुळस्थान आहे. लाल रंग, लोंबती कातडी, गोल वळलेली शिंगे, लोंबती गळापोळी, बेंबट लांब, चाबका सारखे शेपूट, मोठे वशिंड अशी या गाईची शारिरीक वैशिष्टे आहेत. वळूचे वजन ५००-५५० कि.ग्रा. तर गाईचे वजन ३००-३५० कि.ग्रा. असते. सरासरी २ हजार ३५० लिटर (१६००-२७५० लिटर) दूध उत्पादन असून दुधामध्ये स्निग्धांचे प्रमाण ४ ते४.५ टक्के आहे.
गीर गाईचे मुळस्थान गुजरात, दक्षिण काठेवाड, जुनागड येथे आहे. लाल रंग, पांढरे, काळे तांबडे ठिपके, उठावदार कपाळ, काळे भोर डोळे, गोल शिंगे, लांब कान, लांब शेपूट, मोठे वशिंड अशी शारीरीक वैशिष्टये आहेत. वळूचे वजन ५००-५५० कि.ग्रा. तर गाईचे वजन ३५०-५०० कि.ग्रा. असते. सरासरी २ हजार ११० लिटर (८००-३३०० लिटर) दूध उत्पादन असून दुधामध्ये स्निग्धांचे प्रमाण ४ ते४.५ टक्के आहे.
लालसिंधी गाय ही लाल कराची, सिंधी या नावानेही ओळखली जाते. हे मुळस्थान हे सिंध, हैद्राबाद प्रांत, कराची (पाकिस्तान) येथे आहे. बुटकी, मध्यम आकार, लाल रंग, गोल शिंगे, शेतकामासाठी उत्तम शारीरीक वैशिष्टये आहेत. वळूचे वजन ३००-४०० कि.ग्रा. तर गाईचे वजन २५०-३०० कि.ग्रा.ची असते. दूध उत्पादन सरासरी १८४० लिटर (११००-२६०० लिटर) असून दुधामध्ये स्निग्धांचे प्रमाण: ४ टक्के असते.
थारपारकर गाय ही थारी, पांढरी सिंधी, कोझी सिंधी या उपनावाने ओळखली जाते. याचे मुळस्थान कच्छ, मारवाड, थारचे वाळवंट, पाकिस्तान येथे आहे. मध्यम शरीरयष्टी, मजबूत बांधा, पांढरा-करडा रंग, लांब शेपूट, मोठे वशिंड अशी शारिरीक वैशिष्टये आहेत. वळूचे वजन ४५०-५०० कि.ग्रा. तर गाईचे ४०० कि.ग्रा. असते. दूध उत्पादन सरासरी १७४९ लिटर (९१३-२१४७ लिटर) असून या दुधामध्ये स्निग्धांचे प्रमाण: ४ टक्के असते.
राठी गाय ही राठ या उपनावाने ओळखली जाते. याचे मुळस्थान राजपूताना, राजस्थान, अलवार जिल्हा, लुनकरनसर येथे आहे. मजबूत शरीर, पसरट कपाळ, मोठे डोळे, लोंबणारे कान, आखुड शेपूट, लाल पांढरट रंग अशी या गाईची शारीरीक वैशिष्टये आहेत. वळूचे वजन ३८०-४५० कि.ग्रा. तर गाईचे वजन ३५०-४०० कि.ग्रा. असते. दूध उत्पादन सरासरी १५६० लिटर (१०६२-२८१० लिटर) असून या दुधामध्ये, स्निग्धांचे प्रमाण: ४ टक्के असते.
लालकंधारी: महाराष्ट्रातील एक खास स्थानिक गोवंश असून मुख्यतः दूध उत्पादनासाठी पाळला जातो. या गायीचा रंग लालसर तांबड्या रंगाचा असतो, ज्यामुळे तिला ‘लालकंधारी’ म्हणून ओळखला जातो. ही गाय दुधाची उत्कृष्ट गुणवत्ता व चवीसाठी ओळखली जाते. दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते. या गायीचे शरीर मजबूत व उंच असून, ती विविध पर्यावरणीय परिस्थितींमध्ये चांगली जुळवून घेते. नांदेड जिल्ह्यातील प्रामुख्याने कंधार तालुक्यात या गोवंशाचे आढळस्थान असून, उत्तर कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. दूध देण्याची क्षमता सामान्य असून, बैलांचा उपयोग शेतीकामासाठी अधिक होतो.
गवळाऊ: गवळाऊ गोवंश हा अतिशय काटक व चपळ असून विदर्भातील उष्ण नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेतलेला गोवंश आहे. हा गोवंश शेतीकाम व वाहतूकीसाठी अत्यंत उपयोगी मानला जातो. शंकरपटाच्या शर्यतीमध्येही तरुण गौळाऊ बैल प्रसिद्ध आहेत. नराची मान, वशिंड व पाय हे राखाडी रंगाचे तसेच मादीमध्ये पांढरा रंग दिसून येतो. डोके लांब व नाकाच्या दिशेने अरुंद तसेच कपाळ फुगीर असते. मानेची पोळी चांगली विकसित व सैलसर असून वशिंडाचा आकार मोठा असतो.
डांगी: गोवंश प्रामुख्याने काटक, चपळ, निरोगी असून, नैसर्गिक तेलकट कातडी व टणक खुरांमुळे डांगी बैल घाटपरिसर व अतिपावसाच्या प्रदेशात भात शेती तथा वाहतुकीची कामे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. दूध देण्याची क्षमता कमी आहे, परंतु चांगल्या व्यवस्थापनास दूध उत्पादन १ हजार १०० कि.ग्रॅ. पर्यंत आढळले आहे. गाय मध्यम आकाराची असून, प्रामुख्यानेकातडीचा रंग काळा व पांढरा किंवा पांढरा व लाल असा संमिश्र असतो. या रंगाच्या प्रमाणानुसार त्यांचे सहा वाण आढळून येतात.
देवणी: स्थानिक पातळीवर शेतकरी ‘पांढरं सोनं’ मानतात. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत हा गोवंश अनेकदा ‘चॅम्पियन’ ठरला आहे. बैल शेतीसाठी तर गाईचे दूध उत्पादन उत्तम आहे. उष्ण वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता, मध्यम आकार, भरदार शरीर व डौलदार दिसतात. डोळे पाणीदार असून, पापण्या काळ्या असतात. मोठे व रूंद कान, गुळगुळीत व मऊ, मध्यम जाडीची सैल कातडी व मानेची लोंबती पोळी हे सामान्यतः बाह्य गुणधर्म आहेत. शेपटीचा गोंडा काळा, पांढरा/संमिश्र असतो. वानेरा, शेवरा व बालंक्या ह्या तीन पोटजाती प्रसिद्ध आहेत. उष्ण वातावरणात तग धरून राहण्याची क्षमताही उत्कृष्ट आहे.
कठाणी- एक पारंपरिक स्थानिक गोवंश आहे, जो मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शरीर मजबूत व मध्यम आकाराचे, रंग सामान्यतः गहूवर्णी किंवा राखाडी असतो. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे या गाईंची देखभाल साधारण असते. गोवंश मेहनती व सहनशील असल्याने बैलांचा उपयोग शेतातील कामांसाठी केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत या गायीचा मोठा वापर आहे.
कोकण-कपिला:- कोकण कपिला ही गाय ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पालघर व गोवा राज्यात प्रामुख्याने आढळते. ‘कोकण गिठ्ठा व कोंकण या नावाने स्थानिक स्तरावर प्रसिद्ध आहे. कपिला हे नाव प्राचीन ऋषी कपिल यांच्याकडून तर, कोंकण हे नाव मूळ उगम स्थानानुसार प्राप्त झाले आहे. शरीराने मध्यम असल्याने कमीत कमी उपलब्ध चाऱ्यावर या गायी तग धरून राहतात. कोकणातील डोंगराळ व त्यांच्या मूळ भागातील उष्ण-दमट हवामानात जड काम करण्याची क्षमता चांगली आहे. या जनावरांचे लहान, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेत महत्वपूर्ण योगदान आहे.
राज्य शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतला असून अशाप्रकारचे निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालनात गुंतलेल्या लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषि महाविद्यालय, पुणे : या केंद्रामध्ये उपलब्ध सोई-सुविधाबाबत माहिती मिळविण्यासाठी https://www.facebook.com/देशी-गाय-संशोधन-व-प्रशिक्षण-केंद्र-106376121266033/ या फेसबुक, www.icrtcmpkv.com संकेतस्थळ आणि https://youtube.com/channel/UCJvWJIZ5SoNrxNCssBMpSBw या ट्युब चॅनेलला भेट द्यावी तसेच ९८८१७२१०२२ या भ्रमणध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा.





















