गोळीबारात तरुण गंभीर जखमी
marathinews24.com
पुणे – शहरातील नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.१७) मध्यरात्री कोथरूड भागात कुख्यात नीलेश घायवळ टोळीने तरुणावर गाेळीबार केल्याची घटना घडली. घटनेनंतर कोथरूड परिसरात घबराट उडाली. गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. प्राथमिक तपासात कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ टोळीतील सराइतांनी तरुणावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन – सविस्तर बातमी
प्रकाश धुमाळ असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुसा शेख, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयूर कुंभारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख, आखाडे, राऊत, कुंभारे हे काेथरूडमधील निलेश घायवळ टोळीतील सराइत आहेत.
कोथरूड परिसरात बुधवारी रात्री शेख, राऊत, आखाडे, कुंभारे यांनी धुमाळ याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. गाेळीबारात धुमाळ गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या धुमाळ याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुमाळ याच्या मानेला गोळी चाटून गेली असून, दोन गोळ्या मांडीत शिरल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून धुमाळ याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या चौघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. कोथरूड भागात गजानन उर्फ गज्या मारणे आणि निलेश घायवळ टोळीची दहशत आहे. या दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी एका संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलिसाांनी ‘मकोका’ कारवाई केली होती. घायवळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. घायवळ याला न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यंपासून कोथरूड भागात शांतता होती. त्यानंतर बुधवारी रात्री घायवळ टोळीतील सराइतांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे.
नाना पेठेत विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला ५ सप्टेंबर माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषवर बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा, पुतणे शिवम, अभिषेक, शिवराज, तसेच माजी नगरसेवक लक्ष्मी आंदेकर यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे.





















