उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे
marathinews24.com
मुंबई – पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणांनी परिपूर्ण नियोजन करावे. तसेच वारकऱ्यांना आरोग्य, पिण्याचे स्वच्छ पाणी यासह इतर सर्व दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी दिल्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे पूर्व तयारी व नियोजनाची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास पुरातन रुप देण्यासाठी शासनाने दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग करण्याच्या सूचना देऊन उपसभापती डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, मंदिरामध्ये वायुविजनाची योग्य सुविधा निर्माण करावी. विद्युतीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे करावे. चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेल्या खंड्ड्यांचे मार्किंग करून त्यांना लालबावटा लावण्यासारख्या उपाययोजना कराव्यात. याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. पंढरपूर शहरातील रस्त्यांवर पुरशा प्रमाणात विजेचे खांब लावावेत. कोणताही कोपरा, रस्त्याचा शेवटचा भाग अंधारा राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
महिलांसाठी स्वच्छतागृहांची चांगली सोय उपलब्ध ठेवावी. परिवहन महामंडळाने गाड्यांचे योग्य नियोजन करावे. एस.टी. विषयी काही तक्रारी असल्यास तसेच एखाद्या महिलेस एसटी बस मधून प्रवास कराताना काही अडचण असल्यास तक्रार करता यावी यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि त्याची प्रसिद्ध सर्वत्र करण्यात यावी, अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, रस्त्यांने चालताना वाहन चालकांना दिंडीतील वारकरी व्यवस्थित दिसावेत यासाठी रस्त्यांवर विद्युत दिव्यांची व्यवस्था करावी. शहरात वारी काळात स्वच्छता ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. घाटांच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे. घाट बांधताना ते ज्येष्ठ आणि दिव्यांग यांनाही व्यवस्थित चढता आणि उतरता येईल अशा पद्धतीचे बांधावेत. भक्त निवासामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी रॅम्पची व्यवस्था करावी. घाटांवर मुलांना, वृद्धांना आणि दिव्यांगांना बेवासर सोडण्याचे प्रकार घडतात.
त्यामुळे महिला व बालविकास विभागाने घाटांवर पथकांची नियुक्ती करावी. सफाई कर्मचाऱ्यांची चांगली व्यवस्था करावी. सर्व विभागांनी चांगली तयारी केल्याचेही सभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. याबैठकीमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूक, एसटी बस, घनकचरा व्यवस्थापन, मैला निस्सारण या बाबींचा आढावा घेण्यात आला.