शिक्षकाला २० वर्ष सक्तमजुरी
marathinews24.com
पुणे – शाळकरी मुलीवर अत्यचार करणाऱ्या शिकवणी चालकाला विशेष न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. संजय रमेश शर्मा (वय ५६, रा. राधिका एम्पायर, जगतापनगर, वानवडी) असे शिक्षा सुनावलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे.
धक्कादायक… पुण्यातील रेस्टोरंटवरील छाप्यांमध्ये खाजगी व्यक्तींचा समावेश – सविस्तर बातमी
शाळकरी मुलगी शर्मा याच्याकडे शिकवणीला जायची. ३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत शर्माने शाळकरी मुलीला धमकाविले. मुलीच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. अत्याचारामुळे घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली, शर्मा याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी करुन शर्मा याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाकडून सरकारी वकील नितीन कोंधे यांनी बाजू मांडली. आरोपी शर्माने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, शिक्षकी पेशाला काळीमा फासणार आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील कोंधे यांनी युक्तिवादात केली. पीडित मुलीची साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शर्मा याला २० वर्ष सक्तमजुरी आणि ३७ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. दंड न भरल्यास नऊ महिने सश्रम कारावारासाची तरतूद न्यायालयाने केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाज पार पाडण्यात आले. दिनेश जाधव यांनी न्यायालयीन कामकाजात साह्य केले.





















