वाहनांच्या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू; १३ जण जखमी
marathinews24.com
पुणे – साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला. या कंटेनरने १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत ८ जण जिवंत जळाले तर १३ जण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. हा अपघात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सेल्फी पॉइंटजवळ झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
पार्टटाईम नोकरीचे आमिष भोवले, तरूणाला १३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाकच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याने पुढील वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. जवळपास छोट्या मोठ्या मिळून १२ वाहनांना कंटेनरने धडक दिली. त्यात कार चेपल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनच्या धडकेत मोटार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, कंटेनरसह इतर वाहनांतील मिळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तसेच साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन वाहतूक पोलिसांनी दोन तासांसाठी बंद ठेवली होती.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे
स्वाती संतोष नवलकर ( वय ३७ रा. विश्वास पॅलेस धायरी फाटा) शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४) दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय ५८ दोघे रा. सत्यसाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक १०, धायरी फाटा पुणे) मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय ३ पॅराडाईज वन, स्वराज कॅपिटल जवळ, लक्ष्मी चौक, चिखली पुणे) कार चालक धनंजय कुमार कोळी (वय ३० रा. सोनवणे वस्ती चिखली पुणे,मुळ- जयसिंगपूर कोल्हापूर ) रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ रा. लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा)
अपघातात जखमी व्यक्तींची नावे
सोफिया अमजद सय्यद ( वय १५ राहणार रुपीनगर निगडी) रुकसाना इब्राहिम बुरान वय ४५) बिस्मिल्ला सय्यद (वय ३८ रा. खंडोबा माळ चाकण ) इस्माईल अब्बास बुरान (वय ५२ रा. रुपीनगर निगडी) अमोल मुळे (वय ४६ रा. काळेवाडी फाटा) संतोष सुर्वे (वय ४५ रा. भूमकरनगर नऱ्हे) सय्यद शालीमा सय्यद, जुलेखा अमजद सय्यद (वय ३२) अमजद सय्यद (वय ४०,सर्व रा. भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे) सतीश वाघमारे (वय ३५ रा. शिरूर खांदाड नांदेड ) सोहेल रमनुद्दीन सय्यद (वय २० रा..निकोडो चाकण) शामराव पोटे (वय ७९ रा. हिंजवडी) अंकित सलीयन ( वय ३० रा. तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक)
आरडाओरड, गलक्याने परिसरात भयावह स्थिती
कंटेनर चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली होती. त्यातच काही चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीची आरडा ओरडा करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठय़ा प्रमाणावर पसरल्यामुळे कुणालाच त्यांच्या मदतीला जाता येत नव्हते. अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी भयावह वातावरण निर्माण झाले होते.
रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते
अपघाताच्या ठिकाणी अग्निशामक दलासह स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिकांसह तरूणांकडून जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच परिसरातील वाहतूक वळविल्यामुळे कोंडी सोडविण्यासाठी तरूणांनी वाहतूक अमलदारांसोबत काम केले.
चालकाने मद्यप्राशन केले की नियंत्रण सुटले?
अपघात करणाऱ्या कंटेनर चालकाने मद्यप्राशन केले होते का? की त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यानी भेट देऊन मदतकार्य सुरु केले.
नवले पुलावर असा घडला अपघात
नवले पुलावर अपघात होऊन ३ वाहनांनी पेट घेतल्याची वर्दी गुरुवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन, पीएमआरडीए रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशी ८ अग्निशमन वाहने रवाना झाली. घटनास्थळी दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकल्याने पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली.
दुर्देवाने घटनेत कंटेनर मधून दोन पुरुष आणि कारमधील दोन पुरुष, दोन महिला व मुलगी असे ८ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. कंटेनर चालकाने आग लागण्याआधी अनेक वाहनांना धडक दिली होती. त्यामध्येही अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकारी, ४० जवान घटनास्थळी कार्यरत होते.
नवले पुलावर फेब्रुवारी २०२४ मध्ये घडला होता मोठा अपघात
भरधाव टँकर चालकाने 7 ते 8 वाहनांना धडक दिल्याची घटना 10 फेबुवारी 2024 मध्ये नवले पुलावर घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नव्हते. टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली होती. नवले पूल, भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत. नवले पूल परिसरात एकापाठोपाठ झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. बाह्यवळण मार्गाकरील दरीपूल ते नकले पुलावर तीव्र उतार आहे. उताराकर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.




















