विठ्ठलराव तुपे पाटील सभागृहात दिमाखात पार पडला कार्यक्रम
marathinews24.com
हडपसर – नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर व्हीनस वर्ल्ड स्कूल्स (CBSE) तर्फे ‘मी कशी घडले?’ या संकल्पनेवर आधारित ‘सन्मान आदी नारिशक्ती’ हा उपक्रम विठ्ठलराव तुपे पाटील सभागृहात दिमाखात पार पडला.
या उपक्रमात प्रशासकीय अधिकारी सौ. सुनंदा वाखारे, डॉ. रीमा वाय. काशीवा (संचालक – सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी, नोबेल हॉस्पिटल), कारगिल युद्धवीरांगना मेजर वंदना शर्मा, ॲक्सेन्चर पीएमओ लीड सौ. राधा अमित जोशी, दंतवैद्य व आयर्नमॅन स्पर्धा पूर्णकर्त्या डॉ. स्मिता वाकचौरे, सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका श्रीमती बागेश्री मंथलकर, व्यावसायिक सूत्रसंचालक सौ. स्नेहल दामले, डॉ. शुभांगी उंबरकर (सीएसआयआर–एनसीएल) आणि शिक्षणतज्ज्ञ सौ. संयुक्ता भोसले या नऊ मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला.
‘मी कशी घडले?’ या चर्चासत्रात मान्यवरांनी स्वतःचे अनुभव, संघर्ष आणि यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने झाली. गीतांजली वैशंपायन यांच्या सुरेल गायनाने आणि सातवी-आठवीतील मुलींच्या नृत्यप्रस्तुतीने ‘नवदुर्गांचे स्वागत’ करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृण्मयी वैद्य यांनी प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन सौ. मधुरा दाते यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. नीलम शेलार यांनी केले. समारोप ‘पसायदानाने’ झाला.
या उपक्रमाची संकल्पना संचालक श्री. माधव राऊत यांची असून संचालिका सौ. पूनम राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. नवरात्रीत पारंपरिक दांडिया-गरबा यापेक्षा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारा ठरावा हा यामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी बहुमोल ठरले.





















