मारहाण अन सोनसाखळी चोरी केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – रस्ते कामावरून सुरू असलेल्या ’जन आक्रोश आंदोलनाच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदारासह ९ जणांविरुद्ध मारहाण आणि सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे घडली होती.
डोक्याला पिस्तूल लावून बिल्डरकडून १० फ्लॅट बळकावले – सविस्तर बातमी
आमदार बापूसाहेब पठारे, शकील शेख, महेंद्र आबा पठारे, सुरेंद्र बापूसाहेब पठारे, रवींद्र बापूसाहेब पठारे, किरण बाळासाहेब पठारे, सागर नारायण पठारे, सचिन किसन पठारे, रूपेश मोरे यांच्यावर बंडु शहाजी खांदवे (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी खांदवे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. आता हा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगाव भागात ३१ कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊनही रस्त्याचे काम थांबवले होते. रस्ता खराब रस्त्यांमुळे शाळकरी मुलगी आणि कॉलेज विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने, खांदवे यांनी ५ ऑक्टोबरला जन आक्रोश आंदोलन’ आयोजित केले होते. आंदोलनाची व्हॉट्सअँप पोस्ट वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापुसाहेब पठारे यांच्याकडे पोहोचल्यानंतर वाद सुरू झाला. पठारे यांनी घटनास्थळी येऊन खांदवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांची सोडेतीन लाखांची सोनसाखळी चोरी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दि. ९ ऑक्टोबरला खांदवे यांनी रुग्णालयातून जबाब नोंदवला. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















