गांजा विक्रीतील महिलेसह ५ जण गजाआड
marathinews24.com
शिरूर – रांजणगाव परिसरात वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी ५३ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा विक्री, तसेच तस्करी प्रकरणात एका महिलेसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगर मार्गावर २४ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी विशेष कृती दलाचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी मोटारीतून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश गवळी यांना मिळाली. पोलिसंनी सापळा लावून मोटार थांबविली. मोटारीची तपासणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत २३ किलो गांजा सापडला.
बीड जिल्ह्यात हाहाकार, शेतकऱ्यांची पीके पुरात – सविस्तर बातमी
याप्रकरणी वाशिम अब्दुल सय्यद (वय ३५), मुबशीर उर्फ जिमी मन्सूर खान (वय २७) आणि राहुल रामदास कणगरे (वय २६, तिघे रा. दत्तनगर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रांजणगाव पोलीस ठाण्यातील पथकाने कारवाई करून २८ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सात लाख रुपये आहे. या प्रकरणी दिव्या अतुल गिरे (वय २७, रा. सृष्टी सोसायटी, बाभुळसर, ता शिरूर, जि. पुणे, मूळ रा. दैवदैठण, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) सूरज दिलीप शिंदे (वय २८, रा. दैवदैठण, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. २६ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास बाभुळसर परिसरातील सृष्टी सोसायटीतील एका बंगल्यात गांजा साठा करून ठेवल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली.
पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथून २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपी दिव्या गिरे आणि सूरज शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. चैाकशीत दिव्या गिरेचा पती अतुल यांना गांजा विक्रीसाठी आणून दिल्याची माहिती मिळाली. अतुल गिरे पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दोघा आरोपींना शिरूर न्यायालयाने सोमवारपर्यंत (२९ सप्टेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने, विलास आंबेकर, गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रवीण पिठले, योगेश गुंड, विद्या बनकर, माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, रामेश्वर आव्हाड, हेमंत इनामे यांनी ही कारवाई केली.



















