अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा दणका
marathinews24.com
पुणे – अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार अवघ्या काही दिवसांत मेफेड्रोन (एमडी) आणि गांजा असा तब्बल १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. दोन्ही कारवाईत पाच तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. साहील शफीक शेख (वय २३) शाहाबाज जहिर खान ( वय २३) वासिम अब्दुल सय्यद (वय ३५) मुबशीर उर्फ जिमी मनसुन खान (वय २७) राहुल रामदास कनगरे (वय २६ सर्व राहुरी, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडित झाली एचआयव्ही’बाधित – सविस्तर बातमी
राज्य शासनाने अंमली पदार्थ तस्करांविरुध्द कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात प्रभावी मोहिमा राबविण्यात येत आहे. कोल्हापूर कृती विभागाच्या पथकाने २२ सप्टेंबरला पुणे शहरातील काळेपडळनजीक धाड टाकली. सय्यदनगर, हडपसर येथील साहील शफीक शेख, शाहाबाज जहिर खान यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल १ लाख ६० हजारांचे मेफेड्रोन जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक माधवानंद धोत्रे तपास करत आहेत.
टास्क फोर्सने २४ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस हद्दीत अहिल्यानगर महामार्गावर मोठी कारवाई केली. तिघा गांजा तस्करांना अटक केली. वासिम अब्दुल सय्यद, मुबशीर उर्फ जिमी मनसुन खान, राहुल रामदास कनगरे यांच्याकडून १० लाख ४० हजारांचा तब्बल २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे तपास करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस महासंचालक (सीआयडी) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस महानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिवाजी शिंदे, एपीआय माधवानंद धोत्रे, एपीआय समाधान मचाले यांच्या पथकाने केली आहे.
अमली तस्करांची माहिती द्यायची, आम्हाला कळवा
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उद्देश फक्त अवैध विक्री व वितरणावरील कारवाईसाठी मर्यादित नसून, व्यसनाधीनांचे पुनर्वसन आणि समाजात जनजागृती करणे आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, राज्यात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, साठा, वाहतूक किंवा तस्करीची माहिती असल्यास व्हाट्सअप क्रमांक ७२१८००००७३ या संपर्कावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहेत.




















