१२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः अवैध शस्त्रे, अमली पदार्थ आणि दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहीम राबवण्यात आली. २० ते ३१ मार्च या १२ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण शहरात व्यापक स्तरावर कारवाया करण्यात आल्या. गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी जबरदस्त लगाम घातला. यादरम्यान पोलिसांनी १६६ गुन्हे दाखल केले आहेत.
मोहिमेदरम्यान शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. आर्म्स ॲक्ट अंतर्गत एकूण २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अमली पदार्थांच्या विक्री आणि साठ्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये १३ गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवायांमुळे गुन्हेगारी नेटवर्कचे कंबरडे मोडले आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर देखील पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. ३१ मार्चपर्यंत १६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३४ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे ५ लाख ८१ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये २२०० लिटर गावठी दारू, १०८ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी आणि २० लिटर रसायन जप्त केले आहे. यासोबतच १ हजार ३३७ दारूच्या बाटल्या, १५३ गुटखा आणि तंबाखूची पाकिटे देखील जप्त करण्यात आली. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पिणाऱ्यांना आणि अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या अवैध हातगाड्यांवर पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत १९५ व्यक्ती व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
पुणे पोलिस दलातर्फे २० ते ३१ मार्च दरम्यान ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवण्यात आले. १६६ पेक्षा अधिक गुन्हे यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून त्यांच्या परिसरात अवैध शस्त्रे, अमली पदार्थ किंवा दारू विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त





















