सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दुसर्या घटनेत सायबर चोरट्यांनी जेष्ठाला बँक खाते अपडेट करण्याची बतावणी करीत साडेसहा लाखांचा गंडा घातला आहे.
वैमनस्यातून तरूणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक मुंढवा परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी ३७ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले होते. व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.
बँक खाते अपडेटच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मॉडेल कॉलनी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी ११ एप्रिलला त्यांना संपर्क साधला. खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. बँक खाते अद्ययावत करण्यात येणार असून, त्यासाठी खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली. चोरट्यांनी मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतला. बँक खात्यातून साडेसहा लाख रुपयांची रक्कम दुसर्या खात्यात वळविली. पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.





















