प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टी प्रकरण
marathinews24.com
पुणे – शहरालगत असलेल्या तुळापूरमध्ये फार्महाऊसवर झालेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तरुण-तरुणींसह त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. कारवाईदरम्यान काही अल्पवयीनांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले असून, त्यांनाही मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले – सविस्तर बातमी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तुळापूरातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून मद्यसाठा, गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स जप्त केले होते. याप्रकरणी आयोजक, बारटेंडर, डीजे ऑपरेटर, कर्मचार्यांहस पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींसह तब्बल ७८ जणांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही तरुण-तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल अद्यापपर्यंत आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. ८ )राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्यासोबत बैठक घेतली.
उत्पादन शुल्क आणि पोलिसांमध्ये राहणार समन्वय
शहरासह जिल्ह्यात फार्महाऊस, रिसॉर्ट किंवा खासगी ठिकाणी आयोजित करण्यात येणार्या पार्ट्यांना उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी देताना त्यांना पुणे पोलिसांशी समन्वय ठेवावा लागणार आहे. त्याची माहिती माहिती ई-मेलद्वारे पुणे पोलिसांना देण्यात यावी, जेणेकरून आवश्यक पोलिस बंदोबस्त, देखरेख आणि पडताळणी करता येईल, अशी सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत. परवानगी प्रक्रियेत विविध यंत्रणांमधील समन्वय वाढल्यास भविष्यात अशा पार्ट्यांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
असे होणार सममुपदेशन
रेव्ह पार्टीत अल्पवयीनांचा सहभाग, अमली पदार्थांचे सेवनासह इतर नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाईसोबतच जनजागृती आणि समुपदेशनावरही भर दिला जाणार आहे. मुलांनी अवैध कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये, ते उशिरापर्यंत कुठे जातात, कोणासोबत मैत्रीत आहेत, ते काय करतात यावर पालकांनी लक्ष ठेवावे, या उद्देशाने हे समुपदेशन केले जाणार आहे.
तुळापूर परिसरात पार्टीत सहभागी झालेल्या तरूण-तरूणींसह पालकांचे समुपदेशन केले जाणार असून, यासाठी उत्पादन शुल्क विभागासह इतरांनाही सहभागी केले जाणार आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर






















