साडेसहा लाखांची रोकड हिसकावून चोरटे पसार
marathinews24.com
पुणे – सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाने रखवालदाराकडे ठेवण्यासाठी दिलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली. पिशवीत साडेसहा लाखांची रोकड, दोन मोबाइल असा सहा लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज होता. गुलटेकडीतील एका साेसायटीच्या आवराात ही घटना घडली. याबाबत व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाचा मोबाइल क्रमांक ‘हॅक’- सायबर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ६९ वर्षीय व्यावसायिक हे गुलटेकडीतील हर्ष सोसायटीत राहायला आहेत. गुरुवारी (९ जुलै) ते रात्री आठच्या सुमारास काम आटोपून सोसायटीच्या आवारात आले. व्यावसायिकाने सोसायटीतील रखवालदाराकडे पिशवी ठेवण्यास दिली. रखलावदार त्यांना सोडण्यासाठी निघाला. त्या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल संच ठेवलेली पिशवी हिसकावून नेली. चोरट्याचा साथीदार सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवर थांबला होता.
रखवालदार आणि व्यावसायिकाने आरडाओरडा केला. दुचाकीवरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करत आहेत.
मोटार चालक महिलेचा मोबाइल चोरीला
मोटार चालक महिलेचा मोबाइल चोरुन नेल्याची घटना मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चैाकात घडली. याबाबत मोटार चालक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रादार महिला घोरपडी परिसरात राहायला आहे. ती गुरुवारी (९ जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास मोटारीतून निघाले होते. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात सिग्नलला मोटार थांबविली. मोटारीची काच उघडी होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ३० हजारांचा मोबाइल संच चोरुन नेला.
पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा मोबाइल चोरीला
पुणे स्टेशन परिसरात प्रवासी तरुणाचा मोबाइल संच चोरुन नेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा मुंबईचा आहे. तो गुरवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील एका टॅक्सी चालकाशी बोलत होता. त्याचे लक्ष नसल्याची संधी साधून खिशात ठेवलेला ३० हजारांचा मोबाइल संच चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करत आहेत.
























