आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शहरात गोळीबाराची दुसरी घटना घडली असून, वैमनस्यातून तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. गोळीबारात तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात सौरभ त्रिंबके जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंढव्यात चोरट्यांकडून १४ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि त्याचा मित्र सोमवारी (७ सप्टेंबर) रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मीनगर भागातील गणपती मंडळाच्या मांडवाजवळ गप्पा मारत थांबले होते. सौरभचा मित्र सागर पंधरकर याच्याशी आरोपींचे वाद झाले होते. आठ ते दहा आरोपी मांडवाजवळ आले. त्यांनी सौरभला शिवीगाळ केली. त्याच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी सौरभच्या पायात शिरल्याने तो गंभी जखमी झाला. गोळीबारानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. जखमी झालेल्या सौरभला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके तपास करत आहेत.
सोसायटीच्या आवारात तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (५ सप्टेंबर) रात्री कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. आरोपींनी केलेल्या गोळीबारात चंद्रकांत रामदास माने (वय २०, रा. हरणाई काॅम्प्लेक्स, भेंडी चौक, आंबेगाव बुद्रुक) हा जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यानंतर कोंढव्यात सोमवारी (७ सप्टेंबर) तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.




















