दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या शासकीय ताफ्यात दुचाकीस्वाराने शिरण्याचा प्रयत्न केल्याची घटना संचेती चौकात घडली. बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दुचाकीस्वार शुभम विजय वनित (वय ३२, रा. नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गणेशोत्सवासाठी अग्निशमन दल सज्ज – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सहायक पोलीस फौजदार भिकुले हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते अंगरक्षक आहेत. १३ सप्टेंबर रोजी मोहोळ यांचा ताफा रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकातून निघाला होता. संचेती चौकातून ताफा निघाल्यानंतर ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवून याबाबतची सूचना वाहनचालकांना दिली. त्या वेळी तेथून निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाने ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केला. ताफ्यात दुचाकी वाहन शिरल्याने अडथळा निर्माण झाला. आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक काठे तपास करत आहेत.




















