ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या विश्वविनायक प्रदर्शनाचे उद्घाटन
marathinews24.com
पुणे – आपल्या हातांनी आशिर्वाद देणारा बाप्पा असो, की ढोलकी वाजवत आनंद साजरा करणारा, बाप्पाचं प्रत्येक रुप आपल्याला तितकंच मोहून टाकतं! कधी हा बाप्पा कलाकाराला कवेत घेत बांधून ठेवतो, तर कधी तो विश्व व्यापून टाकणारा विश्वविनायक होतो. विघ्नहर्ता, सुखकर्ता अशी बाप्पाची एक ना अनेक रुपं आपल्याला कायमच भावतात. गणपतीच्या अशाच विविध रुपांचं दर्शन होतंय ‘विश्वविनायक २०२६’ या कला प्रदर्शनातून…
दिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटना – सविस्तर बातमी
अमित फाटक फाउंडेशन, अगस्त्य आर्ट्स, राष्ट्रप्रथम ट्रस्ट आणि सदैव फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२६’ अंतर्गत ‘विश्वविनायक २०२६’, भव्य कलाप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते झाले. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन १५ ते २० सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या कार्यक्रमावेळी ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष वैभव वाघ, विश्वस्त अनिरुद्ध येवले व माध्यम सल्लागार जीवराज चोले, चित्रकार रविंद्र देव, बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, हिंदू युवा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे, मिनुशील सडवेलकर, आर्याबाग सांस्कृतिक परिवाराचे कल्याण तावरे उपस्थित होते.
दिग्पाल लांजेकर म्हणाले, “भारतीय संस्कृती, गणेशोत्सव आणि पारंपरिक कलांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे. गणेशोत्सवातून कलाकार घडतात, या कलाकारांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व कलेचा प्रसार जगभर व्हायला हवा. कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून ही संस्कृती व कला जगभर पोहोचवण्याचे काम होत आहे.”
किरण केंद्रे म्हणाले, “सध्या उत्सवावरुन विविध प्रकारचे वाद पेटलेले असताना ‘कलायुक्त गणेश’ ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राचा हा उत्सव जगभरात नेणे महत्त्वाचे आहे. गणेशापाशी कलेचा संगम होत असल्याने गणेशोत्सव हे कलेच्या सादरीकरणासाठी अतिशय उत्तम माध्यम आहे. त्यामुळे येत्या काळात अशाप्रकारच्या विधायक उपक्रमांकडे वळायला हवे.”
वैभव वाघ म्हणाले, “गणपती ही बुद्धी आणि कलेची देवता आहे. चर्चा करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आणि कलांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी या महोत्सवाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली. विश्वविनायक हा जगाला जोडणारा म्हणून ओळखला जावा. जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आपली कला सादर करावी हाच यामागील मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात विविध कलाप्रकारांची प्रात्यक्षिकेही होणार असून, त्यामध्ये बुधवारी (ता. १६) सायंकाळी ४ वाजता चित्रकार कुडलय्या हिरेमठ यांचे चित्रकला प्रात्यक्षिक, गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ४ वाजता शिल्पकार नवनाथ फेंगसे यांचे शिल्पकला प्रात्यक्षिक, तर शनिवारी (ता. १९) सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांचे व्यंगचित्रकला प्रात्यक्षिक होणार आहे. या कलामहोत्सवात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांना सहभागी होता येणार आहे.
वैयक्तिक तसेच सामूहिक सहभागाची सुविधा असून, सहभागी प्रत्येक कलाकाराला विशेष सन्मानपत्र देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे संयोजन विजय महामुलकर आणि प्रज्ञा कळसकर यांनी केले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी रुद्रश्री डान्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्यातून गणेशवंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी हिने केले तर आभार श्रीदेवी महामुलकर हिने मानले.




















