उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दाेघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अक्षय दिलीप ननावरे (वय २७, रा. ससाणेेनगर, हडपसर), दीपक सुधाकर चौधरी (वय ३३, रा. सिद्धीविनायक अक्षर विहार सोसायटी, एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत व्यावसायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक तरुण हडपसर भागात राहायला आहे. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाकडून एक कोटी पाच लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. ऑनलाइन पद्धतीने तरुणाकडून १९ लाख रुपये घेतले. आरोपींनी तरुणाला २५ लाख रुपये नफा मिळाल्याचे सांगून तरुणाला दिले. त्यानंतर परतावा न दिल्याने तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी भागात घडली. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. विनोद प्रेम सोनार (वय ३०, रा. मंत्रा रेसीडन्सी, हांडेवाडी, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक रेहमान इसाल पटेल (वय ५५, रा. बसवकल्याण, ता. बिदर, जि. कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार नीलेश जगताप यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विनोद सोनार हे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. उंड्री चौकापासून काही अंतरावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सोनार यांना धडक दिली. अपघातात सोनार गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ट्रक चालक पटेल याला अटक करण्यात आली असून, हवालदार रासकर तपास करत आहेत.




















