गणेश काळे खून प्रकरण
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी टोळीनेच आरोपीच्या भावाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून केला. ही घटना शनिवारी (दि.१) कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडली होती. याप्रकरणी संबंधित हल्लेखोरांसह आंदेकर टोळीविरूद्ध आणखी एका मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
विद्युत रोहित्रातील तारांची चोरी करणार्याला अटक – सविस्तर बातमी
कृष्णा आंदेकर (वय २८), बंडु आंदेकर (वय ६९), स्वराज वाडेकर (वय २५, तिघे रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), अमीर खान (वय २५), मयुर वाघमारे (वय २३) अमन मेहबुब शेख (वय २३, रा. काकडे वस्ती, कोंढवा) अरबाज अहमद पटेल (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे.
आंदेकर टोळीने शनिवारी भरदिवसा रिक्षाचालक गणेश काळे याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करीत खून केला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात समीर काळे याला अटक झाली होती. वनराजच्या खूनाचा सूड उगविण्यासाठी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा यांच्या सांगण्यावरुन गणेश काळे याचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अरबाज पटेल आणि अमन शेख यांना अटक केली आहे. दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. किसन धोंडिबा काळे (वय ५१, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता आंदेकर टोळीविरूद्ध आणखी एक मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान, हल्लेखोर अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराइत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज पटेल याला काही वर्षांपूर्वी तडीपार केले होते. गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये तळेगाव दाभाडे येथे चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमन मेहबुब शेख आणि समर्थ तोरणे यांच्याकडून तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली होती. गणेश काळे खून प्रकरणातील दोन अल्पवयीनांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
इथून झाली टोळीयुद्धाला सुरूवात
कोमकर टोळीने १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर याचा खून केला होता. त्यानंतर आंदेकर टोळीने वनराजच्या खूनाचा सूड उगविण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा ६ सप्टेबर २०२५ रोजी नाना पेठेत गोळीबार करून खून केला होता. त्यानंतर आंदेकरसह १६ जणांना अटक केली. आंदेकरसह साथीदार सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आंदेकर टोळीने गणेश काळे याचाही खून केला आहे.




















